Trump Tariffs: अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाने मंगळवारी दिलेल्या एका आदेशानुसार, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवलेल्या शुल्काचा पहिला परतावा ट्रम्प प्रशासन सुमारे 11 मे पासून देण्यास सुरुवात करेल अशी अपेक्षा आहे.
ट्रम्प यांनी गेल्या एका वर्षापासून जगावर लादलेल्या टॅरिफचा परतावा प्रक्रियेवर देखरेख करणारे न्यायाधीश रिचर्ड ईटन म्हणाले की, प्रभावित झालेल्या आयात नोंदींपैकी काही नोंदी आधीच परताव्याच्या टप्प्यावर पोहोचल्या आहेत.
अमेरिका जारी करणार बेकायदेशीर टॅरिफचा पहिला हप्ता
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांनी लादलेले टॅरिफ 'अवैध' ठरवल्यानंतर दोन महिन्यांहून अधिक काळानंतर आता विविध देशातील आयातदारांना शुल्काचा परतावा मिळण्याचा दिवस जवळ येत आहे. अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयात मंगळवारी दाखल केलेल्या न्यायालयाच्या आदेशानुसार, पहिल्या हप्त्याची रक्कम सुमारे 11 मे पासून देण्यास सुरुवात होऊ शकते.या प्रक्रियेवर देखरेख करणारे न्यायाधीश रिचर्ड ईटन यांनी सांगितले की, 'कन्सॉलिडेटेड ॲडमिनिस्ट्रेशन अँड प्रोसेसिंग ऑफ एन्ट्रीज' म्हणजे CAPE या नवीन प्रणालीद्वारे,शुल्काच्या अधीन असलेल्या आयात मालांपैकी अंदाजे 21% मालाला टॅरिफ माफी दिली गेली आहे. यापैकी, अंदाजे 3% प्रकरणांचा निपटारा झाला असून आता अमेरिकेच्या ट्रेझरीकडून पैसे मिळण्यासोबतच रिफंडची प्रक्रिया सक्रिय झाली आहे.
अमेरिका जगाला देणार 166 अब्ज डॉलरचा परतावा
26 एप्रिलपर्यंत अंदाजे 17 लाख मंजूर मालाचा निपटारा झाला असून परताव्याची प्रक्रियाही सुरू आहे. या परताव्यामध्ये अंदाजे 5.3 कोटी आयातींमार्फत 3,30,000 हून अधिक आयातदारांकडून वसूल केलेल्या अंदाजे 166 अब्ज डॉलर्सच्या शुल्काचा समावेश असेल असे न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार समजले आहे.
भारताला किती मिळणार ट्रम्प टॅरिफ परतावा
अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या मनमानी टॅरिफला बेकायदेशीर ठरवल्यावर आता जगातील असंख्य आयातदारांना परताव्याची प्रतीक्षा आहे, ज्यामध्ये भारताचाही समावेश आहे. भारतीय निर्यातदारांना अंदाजे 10 ते 12 अब्ज डॉलर्स परतावा जारी केला जाऊ शकतो. पण, परतावा थेट भारतीय निर्यातदारांच्या बँक खात्यात जमा केला जाणार नाही तर केवळ अमेरिकी आयातदारच परताव्यासाठी दावा करू शकतात.त्यानंतर परतावा मिळवण्यासाठी भारतीय निर्यातदारांना अमेरिकी खरेदीदारांशी या व्यवहारांवर वाटाघाटी कराव्या लागतील आणि सवलतीच्या वाटपावर सहमती झाल्यावर ही रक्कम भारतीय निर्यातदाराच्या खात्यात जमा केली जाईल.
टॅरिफने जागतिक व्यापाराचे चित्र बदलले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीपासूनच टॅरिफचा बोजा जगावर लादण्यात आलेला. 'Liberation Day' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 2 एप्रिल रोजी, प्रशासनाने IEEPA अंतर्गत अमेरिकेच्या बहुतेक व्यापारी भागीदारांकडून होणाऱ्या आयातीवर व्यापक परस्पर आयात शुल्क लादले. सततच्या व्यापार तुटीमुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक स्थिरतेला धोका निर्माण होत असल्याचा ट्रम्प प्रशासनाने युक्तिवाद केला होता.

