Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Tukaram Mundhe : किचनमध्ये मृत उंदीर, तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, नागपुरातील 'श्री हिरा स्वीट'चा थेट परवाना निलंबित

Tukaram Mundhe : किचनमध्ये मृत उंदीर, तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, नागपुरातील 'श्री हिरा स्वीट'चा थेट परवाना निलंबित

नागपूर : IAS तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वातील अन्न आणि औषध प्रशासनाची राज्यभरात धडाकेबाज कारवाई सुरु आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये यासाठी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात राज्यभरात हॉटेल्स, रेस्टॉरंट, स्वीट्सच्या दुकानांची कारखाने, दूध डेअर, दूध संकलन केंद्र अशा वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई सुरु आहे.

अस्वच्छता किंवा नागरिकांच्या आरोग्यास धोका होईल अशा गोष्टी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जात आहे. नागपुरात अशीच मोठी कारवाई करण्यात आली आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर सुरू असलेल्या धडक तपासणी मोहिमेत नागपुरातील पाचपावली येथील श्री हिरा स्वीटवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. उत्पादन युनिटमध्ये मृत उंदीर आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने संबंधित आस्थापनाचा परवाना तात्पुरता निलंबित केला असून, उत्पादन युनिट बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

स्वच्छतेबाबत अनेक त्रुटी आढळल्या

अन्न व औषध प्रशासनाने 3 जुलै रोजी पाचपावली येथील श्री हिरा स्वीटच्या उत्पादन युनिटची तपासणी केली. या तपासणीदरम्यान स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. उत्पादन विभागातील किचनमध्ये मृत उंदीर आढळून आल्याने ही बाब सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे प्रशासनाने नमूद केले. त्याचबरोबर उत्पादन प्रक्रियेत आणि स्वच्छतेच्या बाबतीत अनेक त्रुटीही अधिकाऱ्यांना आढळल्या.

सहाय्यक आयुक्तांची प्रतिक्रिया

अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अजय सदार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. "आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभर अन्न उत्पादन आणि विक्री करणाऱ्या आस्थापनांची सखोल तपासणी सुरू आहे. ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे", अशी प्रतिक्रिया सहाय्यक आयुक्तांनी दिली.

परवाना निलंबन मागे कधी घेतलं जाणार?

तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्यामुळे श्री हिरा स्वीटचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला आहे. संबंधित आस्थापनाने सर्व त्रुटी दूर करून आवश्यक स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि उत्पादन प्रक्रियेत सुधारणा केल्यानंतरच त्यांना पुन्हा उत्पादन सुरू करता येणार आहे.

सुधारणा पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाकडून पुन्हा तपासणी केली जाईल. अहवाल समाधानकारक आढळल्यास तो आयुक्तांकडे सादर करण्यात येईल आणि त्यानंतरच परवाना निलंबन मागे घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

अन्न-औषध प्रशासनाचा स्पष्ट इशारा

दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या राज्यव्यापी मोहिमेमुळे अन्न व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशाराही अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims