म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषधांसंदर्भात हाती घेतलेल्या धडक कारवायामुळे या दोन्ही घटकांच्या गुणवत्तेमध्ये सरकारात्मक बदल झाला आहे.
सर्वसामान्यांनीही या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देत पुढे येऊन, तब्बल १६ हजार तक्रारी नोंदवल्या आहेत. प्रकरणांतील गांभीर्यानुसार त्यांची घेतली जात आहे. ही खऱ्या अर्थाने लोकचळवळ झाल्याची भावना अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केली.
मुंबई प्रेस क्लबतर्फे आयोजित 'मीट दि प्रेस' या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. कोणत्याही व्यक्तीपेक्षा संस्थात्मक व्यवस्था आणि सक्षम यंत्रणा अधिक महत्त्वाची असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 'मी कोणी सेलिब्रेटी नाही, तर माझे कर्त्यव्य चोख बजावत आहे,' असे त्यांनी यावेळी सांगितले.
औषधांची गुणवत्ता, हॉटेल्समधील कारवाई, अन्न तसेच औषध साक्षरता, दुधातील भेसळ, सदोष रक्तपेढ्यांवरील कारवाई, अंगणवाड्यांमध्ये देण्यात येणारा आहाराची गुणवत्ता यासंदर्भात विचारण्यात आलेल्या विविध मुद्द्यांवर मुंढे यांनी सुस्पष्ट उत्तरे दिली. अंगणवाड्यांमध्ये देण्यात येणाऱ्या आहाराच्या संदर्भात अनेक तक्रारी येत असून त्यात विशेषत्वाने पाहणी करण्यात येत आहे, असं सांगत तुकाराम मुंढे यांनी आपल्या विभागाचं पुढील टार्गेट स्पष्ट केलं आहे.
अन्न व औषध प्रशासनानकडून ३१ जुलैपर्यंत अन्नाशी संबधित तीन हजार १००हून अधिक आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान १६५ आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले. ७५० हून अधिक आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आली आहे.
'कारवाईनंतर अनेक रेस्टॉरंट्सकडून स्वतःहून सुधारणा आणि किचनचं नूतनीकरण केले जात आहे. काही रेस्टॉरंट्सनी ठरावीक कालावधीनंतर स्वतःहून किचन बंद ठेवून स्वच्छता आणि सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेत बदल झाल्याचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे,' असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले आहे.
रक्तदान शिबिरांसाठीही काटेकोर नियम
'रक्त हे औषध आहे. त्यामुळे एफडीएने मुंबईसह राज्यातील रक्तपेढ्यांसाठीही काटेकोर नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहे. त्यासाठी नियमावलीही जाहीर केली आहे. रक्तदान शिबिरांसाठी धोरणामध्ये प्रथमच काटेकोर सूचना देण्यात आल्या आहे. संकलित रक्त, त्यांच्या नोंदी, रक्ततपासणी, रक्ताचे नियोजन या सर्व बाबींवर भर देण्यात आला आहे,' असे मुंढे यांनी सांगितले

