Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा दुसरा मोठा दणका! अवैध औषध उत्पादकांवर धाडी, भ्रामक जाहिराती भोवल्या, 73 लाखांचा माल जप्त

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा दुसरा मोठा दणका! अवैध औषध उत्पादकांवर धाडी, भ्रामक जाहिराती भोवल्या, 73 लाखांचा माल जप्त

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच राज्यभरात भ्रामक औषध जाहिराती आणि नियमभंग करणाऱ्या औषध विक्रेत्यांविरोधात मोठी धडक मोहीम सुरू केली आहे.

'औषधे व जादूटोणादी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४' अंतर्गत राज्यातील विविध विभागांमध्ये एकाचवेळी छापेमारी करत तब्बल ७३ लाख २४ हजार ६५६ रुपयांचा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे. राज्यातील बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागांमध्ये ही विशेष मोहीम राबवण्यात आली. गंभीर आजारांवर हमखास उपचार, चमत्कारिक परिणाम आणि दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या आयुर्वेदिक औषधांच्या जाहिराती प्रशासनाच्या रडारवर होत्या. त्यानंतर औषध निरीक्षकांनी विविध आस्थापनांवर कारवाई करत मोठा साठा जप्त केला.

'दिव्या फार्मसी'च्या उत्पादनांवर मोठी कारवाई


या मोहिमेत दिव्या फार्मसी या उत्पादक कंपनीच्या विविध औषधसाठ्यावर कारवाई करण्यात आली. नागपूर विभागात ७.२६ लाख, नाशिक विभागात ७.१० लाख, बृहन्मुंबई विभागात १४.६८ लाख, कोकण विभागात १८.५८ लाख तर अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातही मोठ्या प्रमाणावर साठा जप्त करण्यात आला.


पुणे विभागात तपासणीदरम्यान दोन मिथ्याछाप (मिसब्रँडेड) अॅलोपॅथी औषधांचा तब्बल २१.८३ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. राज्यभरातील १२ आयुर्वेदिक औषध विक्री आस्थापनांवर ही कारवाई करण्यात आली.

'आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना सवलत नाही'


"जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा आस्थापनेला कोणतीही सवलत दिली जाणार नाही. भ्रामक जाहिराती, अवैध औषध उत्पादन आणि विक्रीविरोधातील कारवाई अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण असेल," असा स्पष्ट इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० आणि संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात थेट न्यायालयीन कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नागरिकांसाठी तक्रार यंत्रणा


एफडीएकडून नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कुठल्याही भ्रामक जाहिरातींवर विश्वास ठेवून स्वतःहून औषधांचे सेवन करू नये, असे प्रशासनाने म्हटले आहे. सेल्फ-मेडिकेशनमुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे. नागरिकांनी संशयास्पद औषध विक्री, अवैध साठा किंवा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबाबत त्वरित तक्रार करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims