Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Vaibhav Sooryavanshi : बेबी बॉस वैभव सूर्यवंशीचं शतक हुकलं पण रेकॉर्डब्रेक खेळी; दुलीप ट्रॉफीच्या इतिहासात 1969नंतर पहिल्यांदाच अशी कामगिरी

Vaibhav Sooryavanshi : बेबी बॉस वैभव सूर्यवंशीचं शतक हुकलं पण रेकॉर्डब्रेक खेळी; दुलीप ट्रॉफीच्या इतिहासात 1969नंतर पहिल्यांदाच अशी कामगिरी

बेंगळुरू : युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने ९२ धावांची आक्रमक खेळी करत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपली क्षमता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र सोमवारी दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील दुसऱ्या दिवशी त्याच्या पूर्व विभागाला मध्य विभागावर पहिल्या डावाची आघाडी घेण्यात अपयश आले.

डावखुरा फिरकी गोलंदाज हर्ष दुबे (६६ धावांत ४ विकेट) आणि वेगवान गोलंदाज यश ठाकूर (६६ भावांत ३ विकेट) तसेच आर्यन पांडे (४३ धावांत तीन विकेट) यांनी पूर्व विभागाला २६६ धावांत गुंडाळले.मध्य विभागानेही आपल्या पहिल्या डावात २६६ धावा केल्या होत्या. सोमवारी दिवसाचा खेळ आटोपला तेव्हा मध्य विभागाने तीन फलंदाजांच्या मोबदल्यात ४५ धावा केल्या होत्या. अमन मोखाडे २३, तर आर्यन पांडे ४ धावांवर खेळत होते. दिवसाचा खेळ संपण्याची घोषणा होण्याआधी वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने कर्णधार रजत पाटीदारला बाद करत मध्य विभागाला मोठा धक्का दिला.

तिलकच्या शतकामुळे दक्षिण विभागाचे वर्चस्व

कर्णधार तिलक वर्मा याने जिगर अन् संयम याचा मेळ साधत नाबाद १०६ धावांची खेळी केल्यामुळे दक्षिण विभागाने सोमवारी दुलीप करंडक क्रिकेटच्या उपांत्य सामन्यात उत्तर विभागावर ९० धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.

तिलकला या दरम्यान श्रेयस गोपाल याची (८७) छान साथ लाभली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी १७५ धावांची भागीदारी केल्यामुळे दक्षिण विभागाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत नऊ विकेटवर २८५ धावा केल्या, उत्तर विभागाचा पहिला डाव १९५ धावांवर आटोपला होता. तिलकच्या आपल्या खेळीतील पहिला चौकार १५४व्या चेंडूवर मारला यावरूनच त्याच्या संयमी फलंदाजीचा अंदाज येतो.

सर्वांत कमी वयाचा अर्धशतकवीर

पंधरा वर्षीय वैभव सूर्यवंशी याने या दरम्यान दुलीप करंडकात सर्वांत कमी वयात अर्धशतकवीर होण्याचा मान पटकावला. त्याने लक्ष्मण सिंग यांचा विक्रम मोडला. त्यांनी १९६९मध्ये १६व्या वर्षी या स्पर्धेत अर्धशतक केले होते. विक्रमापेक्षाही वैभव सूर्यवंशी संयमी खेळी केली हे विशेष. ११८ मिनिटांत ८१ चेंडूंचा सामना करताना तो अवघडलेला दिसला, मात्र बिहारच्या या युवा फलंदाजाने संयमासह झुंजार फलंदाजी केली. त्याला ४० धावांवर जीवदानही मिळाले. सारांश जैनच्या चेंडूवर यश राठोडकडून बॅकवर्ड पॉइंटवर त्याचा सोपा झेल सुटला. वैभव सूर्यवंशीने अभिमन्यू ईश्वरनसोबत पहिल्या विकेटसाठी १६१ धावांची भागीदारीही केली. ईश्वरनने १०६ चेंडूंत संयमित ६९ धावा केल्या.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims