मुंबई : कर्णधारपदाची जबाबदारी अचानक खांद्यावर आली, तरी दबावाखाली निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा वैभव सूर्यवंशी अजिबात डगमगला नाही. दुलीप ट्रॉफीच्या सेंट्रल झोन आणि ईस्ट झोन यांच्यातील सेमी फायनलमध्ये वैभवकडे अनपेक्षितपणे नेतृत्वाची धुरा आली.
ईशान किशन दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर पडल्याने उपकर्णधार असलेल्या वैभवला कर्णधार बनवण्यात आले. कॅप्टन्सी मिळताच त्याने घेतलेल्या एका DRS निर्णयाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.
अचानक मिळाली कॅप्टन्सी, पण वैभवचा आत्मविश्वास कायम
कर्णधारपद हे केवळ मैदानावर नाणेफेक करण्यापुरते मर्यादित नसते. गोलंदाजीत बदल करण्यापासून ते DRSसारखे महत्त्वाचे निर्णय घेण्यापर्यंत कर्णधाराला प्रत्येक क्षणी विचार करावा लागतो. वैभवच्या खांद्यावर ही जबाबदारी अचानक आली. मात्र, पहिल्याच मोठ्या प्रसंगी त्याने आपल्या निर्णयक्षमतेची झलक दाखवली. सेंट्रल झोन प्रथम फलंदाजीला उतरला. सुरुवातीला ईस्ट झोनच्या गोलंदाजांनी त्यांना धक्के दिले. अमन मोखाडे ८ धावांवर, कुणाल चंदेला ६ धावांवर, तर कर्णधार रजत पाटीदार १२ धावांवर बाद झाला.मुकेश कुमारचा चेंडू, जोरदार अपील अन् वैभवचा अचूक निर्णय
एका बाजूला विकेट पडत असताना आर्यन जुयाल डाव सावरण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर चेंडू जुयालच्या बॅटची कड घेत यष्टिरक्षकाच्या हातात गेला. ईस्ट झोनच्या खेळाडूंनी जोरदार अपील केले, मात्र अंपायरने नाबाद असल्याचा निर्णय दिला. आता निर्णय वैभवच्या हातात होता. त्याने गोलंदाज मुकेश कुमारशी चर्चा केली. चेंडूला बॅटची कड लागल्याचा आवाज आल्याचे मुकेशने सांगितले. यानंतर वैभवने वेळ न दवडता DRS घेतला.रिव्ह्यूमध्ये चेंडू बॅटला लागल्याचे स्पष्ट झाले आणि जुयालला बाद देण्यात आले. वैभवच्या या निर्णयानंतर ईस्ट झोनच्या खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केले.
पहिल्याच संधीने वैभवने दाखवली कॅप्टन्सीची झलक
जुयाल ४६ धावांवर बाद झाल्यानंतर सेंट्रल झोनला आणखी धक्के बसले. त्यामुळे वैभवच्या नेतृत्वाखाली ईस्ट झोनने सामन्यावर पकड मजबूत केली. वैभवकडे कर्णधारपद येणे हा योगायोग असला, तरी मैदानावरील त्याचा पहिला मोठा निर्णय मात्र चांगलाच चर्चेत आला आहे. त्यामुळे भविष्यात फलंदाज म्हणूनच नव्हे, तर नेतृत्वाच्या भूमिकेतही वैभवकडे पाहिले जाऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.
