न्यू चंदीगढ: आयपीएल 2026 च्या एलिमिनेटर सामन्यात, राजस्थान रॉयल्सचा 15 वर्षीय सलामीवीर वैभव सूर्यवंशीने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अवघ्या 29 चेंडूंमध्ये केलेल्या 97 धावांच्या झुंजार खेळीने संपूर्ण क्रिकेट जगताला हादरवून सोडले आहे.
या खेळीत 12 उत्तुंग षटकार ठोकून, वैभवने ख्रिस गेलच्या नावावर असलेला, एकाच आयपीएल हंगामात 59 षटकार मारण्याचा टी20 क्रिकेटमधील विक्रम मोडला आहे. वैभवच्या नावावर आता या हंगामात एकूण 65 षटकार झाले आहेत. आपला ऐतिहासिक विक्रम मोडलेला पाहून, युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल स्वतः या वंडर बॉयचा चाहता बनला आहे. ख्रिस गेलने वैभवचे भरभरुन कौतुक केले आहे.
ख्रिस गेलने सोशल मीडियावर काय लिहिले?
ख्रिस गेलने शेअर केलेल्या फोटोंमध्ये टीव्ही स्क्रीन दिसत आहेत, ज्यावर वैभव सूर्यवंशीचे या हंगामातील आणि या सामन्यातील 6 आश्चर्यकारक विक्रम दाखवले जात आहेत, ज्यामुळे तो 'युनिव्हर्सल बेबी बॉस बनला आहे.
- एका हंगामात अनकॅप्ड खेळाडूने केलेल्या सर्वाधिक धावा: 680 धावा
- एका आयपीएल हंगामात सर्वाधिक षटकार: 65 षटकार (ख्रिस गेलचा विक्रम मोडला)
- 200+ च्या स्ट्राईक रेटने 600 हून अधिक धावा करणारा आयपीएल इतिहासातील पहिला फलंदाज
- एका आयपीएल प्लेऑफ/नॉकआऊट सामन्यात सर्वाधिक षटकार: 12 षटकार
- सर्वात कमी चेंडूंमध्ये 10 षटकार मारण्याचा विक्रम: फक्त 24 चेंडू
- एका आयपीएल पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक षटकार: 8 षटकार
मुलानपूरमधील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, वैभव सूर्यवंशीने सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांना चांगलेच धारेवर धरले. त्याने अवघ्या 29 चेंडूंमध्ये 334.48 च्या अविश्वसनीय स्ट्राईक रेटने 97 धावा ठोकल्या. जरी तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद शतकाचा ख्रिस गेलचा विक्रम केवळ 3 धावांनी हुकला, पण या डावात मारलेल्या 12 षटकारांमुळे त्याने गेलच्या मनात एक खास स्थान निर्माण केले.
वैभवच्या जोरावर काल राजस्थानचा संघ क्वालिफायर 2 सामन्यासाठी पात्र झाला. आता ते उद्या गुजरात टायटन्सच्या संघाशी सामना खेळतील. या दोन संघापैकी जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुविरुद्ध खेळेल.

