नवजात बालकांच्या हाडांच्या आणि सांध्यांच्या समस्यांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, त्यापैकीच एक गंभीर स्थिती म्हणजे डिव्हलपमेंटल डिस्प्लासिया ऑफ द हिप (DDH). यामध्ये बाळाचा खुब्याचा सांधा (Hip Joint) योग्यरित्या विकसित होत नाही, ज्यामुळे सांधा सैल होणे, अर्धवट सरकणे किंवा पूर्णपणे निखळणे (Dislocation) असे प्रकार घडू शकतात.
अलीकडेच अभिनेता Varun Dhawan आणि Natasha Dalal यांच्या मुलीला ही समस्या असल्याची माहिती समोर आली आणि सोशल मीडियावर याबद्दल खूप चर्चा पाहायला मिळाली. त्यांच्या मुलीवर सध्या ट्रिटमेंट सुरू आहे पण यामुळे या आजाराबद्दल जनजागृती वाढली आहे आणि पालक अधिक सतर्क झाले आहेत. एक पेडिअट्रिक ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून मी नेहमी सांगतो की, जर या आजाराचे निदान सुरुवातीच्या काळात झाले नाही, तर भविष्यात लंगडणे, तीव्र वेदना आणि चालण्यात कायमस्वरूपी अपंगत्व येण्याचा धोका असतो.
लहान मुलांमधील खुब्याच्या समस्या आणि सुरुवातीची लक्षणे
लहान मुलांमधील खुब्यांचे दोष सुरुवातीच्या काही महिन्यांत सहज लक्षात येत नाहीत. 'कॉन्जेनिटल डिस्लोकेशन ऑफ द हिप' किंवा 'पर्थेस डिसीज' यांसारख्या समस्या दीर्घकाळ अज्ञात राहू शकतात. पालकांनी सजग राहिल्यास आणि डॉक्टरांनी नियमित तपासणी केल्यास हे टाळता येते.
बाळांमधील धोक्याचे संकेत:
- डायपर बदलताना त्रास होणे : जर बाळाचे पाय लांब करताना किंवा डायपर बदलताना खूप ओढाताण करावी लागत असेल, तर ते धोक्याचे लक्षण असू शकते.
- हालचालींवर मर्यादा : विशेषतः पाय एकमेकांपासून दूर करताना खुब्यामध्ये किंवा गुडघ्यामध्ये कडकपणा जाणवणे.
- अनईवन स्कीन (Uneven Skin Creases) : बाळाच्या दोन्ही मांड्यांवरील त्वचेच्या घड्या जर सारख्या नसतील किंवा एका बाजूला जास्त असतील, तर खुब्याचा दोष असू शकतो.
- पायांच्या लांबीत फरक : बाळ जेव्हा पाय गुडघ्यात दुमडते, तेव्हा एका बाजूचा गुडघा दुसऱ्यापेक्षा खाली दिसत असेल, तर ते खुब्या सरकल्याचे लक्षण असू शकते.
- बाळ जेव्हा चालायला लागते, तेव्हा लंगडणे, पायाच्या पंजावर (Toe walking) चालणे किंवा विचित्र चाल (Gait) यावरून हा दोष स्पष्ट होतो. मोठ्या मुलांमध्ये चालताना खुब्यात किंवा गुडघ्यात वेदना जाणवू शकतात.
कारणे आणि जोखीम घटक

DDH होण्यामागे अनेक नैसर्गिक आणि बाह्य कारणे असू शकतात:
- जुळी मुले : गर्भाशयात जागा कमी असल्यामुळे सांध्यांच्या विकासात अडथळे येऊ शकतात.
- अनुवंशिकता : कुटुंबात कोणाला खुब्याचे दोष असल्यास बाळालाही त्याचा धोका असतो.
- चुकीची स्वॅडलिंग पद्धत : जन्मानंतर बाळाला खूप घट्ट गुंडाळल्यास (Swaddling) खुब्याच्या हालचालींवर मर्यादा येतात, ज्यामुळे डिस्प्लासियाचा धोका वाढतो.
निदान आणि तपासणीचे महत्त्व

लवकरात लवकर निदान करणे हाच यावरील सर्वोत्तम उपाय आहे.
- प्रत्येक वेळी लसीकरणासाठी किंवा नियमित तपासणीसाठी गेल्यावर डॉक्टरांकडून 'हिप-अ-मिनिट' (एका मिनिटाची खुब्याची तपासणी) करून घेणे अत्यंत मोलाचे ठरते.
उपचार पद्धती

उपचार हे बाळाचे वय आणि आजाराची तीव्रता यावर अवलंबून असतात:
- पॅव्हलिक हार्नेस (Pavlik Harness) : जर निदान लवकर झाले, तर या विशेष बेल्टचा वापर केला जातो. यामुळे खुब्याचा सांधा स्थिर राहतो आणि त्याचा नैसर्गिक विकास होतो.
- ब्रेसेस किंवा कास्ट : जर निदान उशिरा झाले असेल, तर विशेष प्रकारचे साचे (Casts) लावले जातात.
- शस्त्रक्रिया (Surgery) : काही प्रकरणांत सांधा पुन्हा जागेवर बसवण्यासाठी 'क्लोज्ड' किंवा 'ओपन रिडक्शन' शस्त्रक्रिया करावी लागते.
- सुरुवातीच्या काळात उपचार केल्यास बाळ पूर्णपणे बरे होते आणि त्याचा खुबा सामान्य मुलांसारखा विकसित होतो.
प्रतिबंध आणि गर्भधारणेसाठी टिप्स

जरी DDH पूर्णपणे रोखता येत नसला, तरी काही खबरदारी नक्कीच घेता येते:
- गर्भावस्थेत काळजी : नियमित तपासणी करून बाळाची गर्भाशयातील स्थिती (Position) जाणून घ्यावी. ब्रीच पोझिशन असल्यास जन्मानंतर खुब्याची तपासणी प्राधान्याने करावी.
- योग्य स्वॅडलिंग : बाळाला गुंडाळताना पाय मोकळे राहतील याची काळजी घ्या. बाळाचे पाय नैसर्गिकरित्या दुमडलेले आणि उघडे राहू द्या.
- बेबी कॅरिअर्स : बाळाला उचलण्यासाठी वापरले जाणारे कॅरिअर्स असे असावेत जे मांड्यांना आधार देतात आणि पायांची हालचाल मुक्त ठेवतात.
- पालक आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्यातील जागरूकता या आजारामुळे होणारे कायमस्वरूपी अपंगत्व रोखू शकते. वेळेवर निदान आणि उपचार मिळाल्यास DDH असलेली मुलेही सक्रिय आणि वेदनामुक्त जीवन जगू शकतात
- बाळाच्या पायांच्या लांबीत किंवा मांड्यांवरील घड्यांमध्ये थोडाही फरक जाणवला, तर त्वरित पेडिअट्रिक ऑर्थोपेडिक सर्जनचा सल्ला घ्या.

