अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठी वटपौर्णिमेचे व्रत केले जाते. या सणाला हिंदू धर्मात अत्यंत महत्वाचे मानले जाते. ज्येष्ठ पौर्णिमेला दरवर्षी वटपौर्णिमा साजरी केली जाते. यादिवशी सुवासिनी स्त्रिया सकाळी लवकर उठून स्नान करतात.
देवाची पूजा केल्यानंतर साग्रसंगीत जेवण नैवेद्यासाठी बनवले जाते. त्यानंतर नवविवाहित महिला व सुवासिनी नवीन भरजरी साडी नेसून सजतात. हातात हिरवा चुडा,गळ्यात मंगळसूत्र,केसात गजरा असा सोलाशृंगार करून वडपुजेसाठी सुवासिनी जातात. वडाच्या झाडाची पूजा करून सातजन्म हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात. सायंकाळी व्रत सोडतात तर काहीजण दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. अशाप्रकारे वटसावित्रीचे हे व्रत अखंड सौभाग्यासाठी महत्वाचे मानले जाते. यंदा वटपौर्णिमा केव्हा आहे,पूजेचा शुभमुहूर्त काय व पूजा कशी करावी याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
वटपौर्णिमा तारीख
| ज्येष्ठ पौर्णिमा तिथी प्रारंभ | रविवार 28 जून 2026 | सकाळी 8 वाजून 35 मिनिटांनी |
| ज्येष्ठ पौर्णिमा तिथी समाप्त | सोमवार 29 जून 2026 | सकाळी 8 वाजून 48 मिनिटांनी |
वटपौर्णिमा पूजेचा मुहूर्त
हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ पौर्णिमा तिथी २९ जून सोमवार रोजी येत आहे. यादिवशी वटपौर्णिमेच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ८:५५ ते सकाळी १०:४० यादरम्यान असेल.
वटपौर्णिमा पूजा साहित्य
वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी वाण घेऊन वडाची पूजा करण्यासाठी जावे. पूजेच्या ताटात हळद कुंकू,वडाला बांधण्यासाठी दोरा,सावित्रीच्या पूजेसाठी बांगड्या,मंगळसूत्र शृंगाराचे सामान,दिवा,पाच फळे,आंब्याला महत्व,पाण्याचा तांब्या,कापसाचे सूत,फुले,विड्याची पाने असे सर्व साहित्य घेऊन जावे.
वटपौर्णिमा पूजा विधी
वडाच्या झाडाची पूजा करताना सर्वप्रथम हळदीकुंकू वहावे,मग कापसाचे सूत आणि सौभाग्याचे लेणे म्हणजेच बांगड्या मंगळसूत्र सावित्री देवीला अर्पण करावे. विड्याची पाने ठेवावीत, फळे एका बाजूला ठेवावी मग फुले आणि अक्षता वहावीत. ताटात निरंजन घेऊन औक्षण करून ओवाळावे. पतीच्या आरोग्य व दीर्घायुष्य तसेच सुखी संसारासाठी प्रार्थना करावी. त्यांना तांब्यातील पाण्याने वडाळा प्रदक्षिणा घालावी. सर्वात शेवटी धागा बांधून त्या धाग्याने वडाला सात प्रदक्षिणा माराव्यात व सात जन्माची गाठ आपल्या पतीशी कायम बांधली जावी असे मागणे मागावे.

