मुंबई : विधान परिषदेच्या १७ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला असून, त्यानुसार येत्या दोन दिवसांत आघाडीतील जागावाटप अंतिम केले जाणार आहे.
आघाडी विधान परिषदेच्या सर्व जागा लढवणार असल्याने निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पुन्हा रंगणार आहे.
या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले, 'विधान परिषदेवर निवडून द्यायच्या १६ जागा आणि नागपूरची पोटनिवडणूक अशा सर्व १७ जागा महाविकास आघाडी लढवणार आहे. यासाठी जागावाटपाची प्राथमिक चर्चा आज खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. दोन दिवसांत पुन्हा एक बैठक घेऊन सर्वसंमतीने जागावाटपाचा निर्णय जाहीर करू.'
'भाजप लोकशाही मानत नाही, त्यांनी निवडणुकीत घोडेबाजार मांडला आहे. पैसा फेक, तमाशा देखचा दुसरा अंक सुरू झाला असून, पाच लाख रुपये आगाऊ देऊन नगरसेवकांची पळवापळवी केली जात आहे. अशा परिस्थितीत लोकशाही आणि राज्यघटनेच्या रक्षणासाठी महाविकास आघाडी एकजूटपणे विधान परिषदेची निवडणूक लढवणार आहे,' असेही सपकाळ म्हणाले. 'आघाडीत जागावाटपावरून कोणताही विसंवाद अथवा तिढा नाही तर सुसंवाद आहे. तर दुसरीकडे 'गँग्ज ऑफ ट्रिपल इंजिन' सरकारमध्येच जागा वाटपावरून धुसफूस सुरू आहे,' असे ते म्हणाले.
गडचिरोलीत काँग्रेसमध्ये वाद
गडचिरोली: गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता उघडपणे समोर आला आहे. दहा तालुकाध्यक्षांसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुंबईत भेट घेऊन, सामूहिक राजीनामे सादर केले. नवे जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे यांच्या पदग्रहण सोहळ्यानंतर अवघ्या एका दिवसातच जिल्हा काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
जेथे ताकद तेथे संबंधित पक्षाला प्राधान्य
विधान परिषद जागावाटपाच्या प्राथमिक चर्चेनुसार काँग्रेस सर्वाधिक सात ते आठ जागांवर उमेदवार देण्याची शक्यता आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाकडून पाच ते सहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शप) तीन ते चार जागांवर निवडणूक लढवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जागावाटपाचे सूत्र अद्याप निश्चित नसले, तरी ज्या भागात ज्या पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक आहे, त्या जागांवर संबंधित पक्षाला प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगण्यात येते.

