Dailyhunt
Vidhan Parishad : झिशान सिद्दीकींच्या उमेदवारीसाठी बॉलिवूड सुपरस्टारचा फोन, राष्ट्रवादीच्या गोटात चर्चा, कार्यकर्ते नाराज

Vidhan Parishad : झिशान सिद्दीकींच्या उमेदवारीसाठी बॉलिवूड सुपरस्टारचा फोन, राष्ट्रवादीच्या गोटात चर्चा, कार्यकर्ते नाराज

. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून झिशान सिद्दीकी यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाकडून या एकमेव जागेसाठी अनेक जण इच्छुक होते.

त्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणीही सुरू केली होती. परंतु, उमेदवारीची माळ सिद्दीकी यांच्या गळ्यात पडली. केली. मात्र, त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीतील एका सुपरस्टारने राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांशी संपर्क साधल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या अंतर्गत वर्तुळात आहे.

दादांनी बाबांना दिलेला शब्द

काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर सिद्दीकी यांनी राष्ट्रवादीकडून वांद्रे पूर्व या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. परंतु, त्यांचा पराभव झाला होता. 'बाबा सिद्दीकी यांना अजित पवार यांनी विधान परिषदेचा शब्द दिला होता, तो पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी पाळल्याने मी त्यांचा आभारी आहे', अशी प्रतिक्रिया सिद्दीकी यांनी व्यक्त केली.

बॉलिवूड सुपरस्टारने संपर्क साधला

झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी मिळावी म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टारने राष्ट्रवादीतील नेत्यांशी संपर्क साधल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या अंतर्गत वर्तुळात असल्यामुळे पक्ष आता राजकीय कार्यकर्त्यांचा उरला नसून वांद्रे, लोखंडवाला येथील बॉलिवूड कलाकारांकडून वशिला लावणाऱ्यांचा झाला आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

मिटकरींची जागा रिक्त

अमोल मिटकरी यांचा कार्यकाळ संपल्याने राष्ट्रवादीची एक जागा परिषदेत रिक्त झाली होती. या जागेसाठी स्वतः मिटकरी, पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, उमेश पाटील यांच्यासह अनेक जण इच्छुक होते. तर, राज्यसभा खासदार पार्थ पवार हे माजी खासदार, उद्योगपती संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांच्यासाठी आग्रही होते.

झिशान सिद्दीकींचे अखेर पुनर्वसन

सिद्दीकी हे काँग्रेस पक्षात असताना वांद्रे पूर्व येथून आमदार होते. मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर बाबा सिद्दीकी आणि झिशान या दोघांनीही हाती घड्याळ बांधले होते. बाबा यांना अजित पवार यांनी विधान परिषद देण्याचा शब्द दिल्याचे बोलले जात होते. परंतु, निवडणुकीपूर्वीच बाबा यांची वांद्रे परिसरात हत्या करण्यात आली. त्यानंतर २०२४च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उबाठा पक्षाचे वरुण सरदेसाई यांनी झिशान यांचा पराभव केला. तेव्हापासून झिशान सिद्दीकी हे काहीसे विजनवासात गेले होते. अखेर, पक्षाने विधान परिषदेवर त्यांची वर्णी लावत त्यांचे राजकीय पुनर्वसन केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims