Dailyhunt
Vignesh Shivan On Dhanush: 'त्या गोष्टीची मला लाज वाटते', धनुषसोबतच्या भांडणावर पहिल्यांदाच बोलला नतयनताराचा पती विग्नेश शिवन

Vignesh Shivan On Dhanush: 'त्या गोष्टीची मला लाज वाटते', धनुषसोबतच्या भांडणावर पहिल्यांदाच बोलला नतयनताराचा पती विग्नेश शिवन

चेन्नई: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विग्नेश शिवन आणि सुपरस्टार धनुष यांच्यातील वाद गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. अभिनेत्री नयनताराच्या डॉक्युमेंट्रीवरून सुरू झालेला हा कायदेशीर वाद आता एका भावनिक वळणावर येऊन पोहोचल्याचं पाहायला मिळतंय.

धनुषमध्ये मी माझ्या वडिलांना पाहतो: विग्नेश शिवन

नयनताराच्या डॉक्युमेंट्रीवरून वाद सुरू झाल्यानंतर नयनतारा आणि धनुष अनेकदा समोरासमोर आले, पण त्यांच्यातील टशन दिसून आली. त्यांनी एकमेकांसोबत न बोलणंच पसंत केलं होतं. आता नयनताराचा पती आणि दिग्दर्शक विग्नेश शिवन यानं पहिल्यांदाच यावर भाष्य केलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विग्नेश शिवननं धनुषबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त केलं असून, हे संबंध पुन्हा सुधारू शकतात, अशी आशा व्यक्त केली आहे.

विग्नेश शिवनयानं नुकतीच एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यानं सांगितलं की, तो धनुषचा खूप आदर करतो. तो म्हणाला, "मला धनुष सर खूप आवडतात. २८ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस असतो आणि दुर्दैवानं त्याच दिवशी माझ्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यामुळं मी त्यांच्यामध्ये नेहमीच माझ्या वडिलांना पाहिलं आहे. त्यांच्याशी असलेलं नातं तुटणं हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं नुकसान आहे आणि मला त्याची लाज वाटते, अशा शब्दांत विग्नेश शिवननं त्याच्या भावना व्यक्त केल्या.

इतकंच नाही तर विग्नेशनं पुढं आठवणींना उजाळा देत सांगितलं की, 'व्हीआयपी' (VIP) चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तो दोन वर्षे धनुषसोबत होता. मी त्यांच्यावर इतका विश्वास ठेवायचो की ते जेवल्याशिवाय मी कधीच जेवायचो नाही. कुठंतरी काहीतरी चूक झाली असावी, ज्यामुळं हा दुरावा निर्माण झाला. पण माझ्या सध्याच्या आयुष्यात धनुष सरांचं स्थान खूप महत्त्वाचं आहे, असंही त्यानं नमूद केलं.

दोघांमधील वादाचं नेमकं कारण काय?

हा वाद २०२४ मध्ये सुरू झाला जेव्हा नयनतारानं तिच्या 'नयनतारा: बियॉन्ड द फेअरी टेल' या डॉक्युमेंट्रीमध्ये धनुषच्या 'नानुम राउडी धान' या चित्रपटातील केवळ ३ सेकंदांची क्लिप वापरली होती. यावर धनुषनं नयनतारा आणि विग्नेशला १० कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली होती. यानंतर नयनतारानं एक खरमरीत पत्र लिहून धनुषवर टीका केली होती.

पुन्हा एकत्र येणार?

विग्नेश शिवनच्या भावनिक आवाहानानंतर धनुष नेमका काय प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कामाबद्दल बोलायचं झालं तर विग्नेश सध्या त्याच्या आगामी 'लव्ह इन्शुरन्स कंपनी' (LIK) या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तयारीत आहे. हा चित्रपट १० एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims