-नीना कुळकर्णीमी साधारण दहाएक वर्षांची असेन. आयुष्यात पहिल्यांदा नाटक पाहायला गेले होते. नाटकाचे नाव होते 'जास्वंदी'. खरे तर नाटकाचा विषय मला फारसा समजला नव्हता; पण एका अभिनेत्रीच्या रंगमंचावरील वावरामुळे मी अक्षरश: भारावून गेले होते.
ती अभिनेत्री म्हणजे माझ्या बाई; ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता. त्यांनी ज्या पद्धतीने अभिनय केला होता; त्यातून व्यक्तिरखेविषयी सारे काही समजले होते. माझ्या आयुष्यातले पहिलेच नाटक मी इतक्या उच्च दर्जाचे पाहिले, याचा मला आनंद वाटतो.
'जास्वंदी' पाहिल्यानंतर काही वर्षांनी म्हणजे १९७६मध्ये रवींद्र नाट्य मंदिरात राज्यनाट्य स्पर्धेच्या विजेत्यांसाठी शिबीर आयोजित केले होते. विजया मेहता ते शिबीर घेणार होत्या. त्यांनी मला एका खुर्चीत बसून काहीतरी करायला लावले होते. मी भांबावून गेले होते. हे शिबीर म्हणजे माझा आणि बाईंचा पहिला परिचय. कालांतराने एकदा मला 'बाईंनी बोलावलंय' असा निरोप आला. साहित्य संघात मी त्यांना भेटायला गेले. त्यांनी मला 'हमीदाबाईची कोठी' या नाटकासाठी बोलावले होते. त्या म्हणाल्या, 'माझी शब्बो आहेस तू या नाटकात!' …त्यांचे हे शब्द आजही आठवतात.
नाटकाच्या तालमी सुरू झाल्या आणि माझे आयुष्य बदलले. त्यांच्या सान्निध्यात, दिग्दर्शनात जे धडे मिळाले; ते आयुष्यभर लक्षात राहिले. 'हमीदाबाईची कोठी' या नाटकाच्या वेळी माझ्यासाठी एक सर्वांत मोठी गोष्ट होती; ती म्हणजे त्यात स्वत: बाई अभिनय करत होत्या. त्यामुळे मला त्यांचा सहवास जास्त लाभला. हे दुर्मीळ होते. ते नाटक खूप चालले. माझ्या अभिनयप्रवासाची अगदीच सुरुवात होती ती; त्यामुळे माझ्याकडून त्यात कसे काय काम झाले, याचे मला आश्चर्यच वाटते. आम्ही २५-३० दिवस दौरे करायचो. मी सतत बाईंचे निरीक्षण करायचे. बाईंची शेपूटच होते मी. त्यांनीही मला शेवटपर्यंत त्यांच्या छत्रछायेखाली ठेवले. त्या माझ्या गुरू कधी झाल्या हे कळलेच नाही.
'हमीदाबाईची कोठी', 'महासागर' आणि 'सावित्री' या तीन नाटकांमध्ये मी त्यांच्यासोबत काम केलं. मी खऱ्या अर्थाने त्यांच्या तालमीत तयार झाले. तालीम घेण्याची त्यांची पद्धत अतिशय शिस्तबद्ध आणि अभ्यासू. शिस्त म्हणजे मास्तरकी नव्हे; तर त्यांचे आखीव-रेखीव काम असायचे. नाटकाची पूर्वतयारी करण्याच्या बाबतीत त्यांचा हात कोणीच धरू शकणार नाही. 'हमीदाबाईची कोठी'च्या वेळी आम्ही आधी छोट्या खोलीत दोन-दोन जण वाचन करायचो, मग तिघे-तिघे आणि ते झाल्यानंतर थोड्या मोठ्या खोलीत जायचो. तिथे सगळ्यांचे एकत्र वाचन असायचे. त्यानंतर आम्ही रंगमंचावर जायचो. अशा तीन-चार पायऱ्या असायच्या. 'महासागर' नाटकात मी, भारती आचरेकर आणि नाना पाटेकर होतो. या नाटकाची तालीम जास्त दिवस चालली. आम्हाला व्यक्तिरेखांचा नेमका सूरच सापडेना. वास्तववादी नाटकात काम करण्याचा आम्हा सगळ्यांचा पहिलाच अनुभव होता. त्यामुळे व्यक्तिरेखेवर नेमकी पकड येत नव्हती. ती नसल्यामुळे बाईंनी नाटक पुढे ढकलले. नाटक पूर्णत: जमून आल्यानंतरच रंगमंचावर जायला हवे, हा त्यांचा त्यामागचा हेतू होता. परत दोन महिन्यांनी त्यांनी पुन्हा तालीम सुरू केली. सूर सापडला, नाटकाला आकार आला. 'महासागर' प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.
बाईंनी कधीही 'असं कर, अशी बस, असं बोल' असं म्हणत कलाकारांना स्वत: करून दाखवले नाही. तालीम सुरू असताना त्या नोंदी लिहायच्या. तालीम संपली, की मग अशा प्रकारे सांगायच्या, की त्यांच्या बोलण्यातून आमचा स्वत:चा शोध सुरू व्हायचा. त्या शोधातूनच नाटक उभे राहायचे. त्या कलाकारांना स्वातंत्र्य द्यायच्या. 'महासागर'च्या वेळी त्या म्हणाल्या होत्या, की 'तू झाडू मारते आहेस की हॉकी खेळतेयस?' त्या दिवशी मी घरी जाऊन झाडू मारला. अगदी चंपूसारखी साडी नेसून! ही तालीम मी नाटक सुरू होईपर्यंत केली. मी चंपूपेक्षा पूर्ण वेगळी! वयाने, संस्काराने. मी कशी साकारणार ही भूमिका? त्या फक्त एवढेच म्हणाल्या, 'तुझ्या आईचे निरीक्षण कर'. अशा प्रकारे त्यांनी आम्हाला आमच्या व्यक्तिरेखांपर्यंत नेले. त्यांनी कलाकारांना विचार करण्यासाठी प्रवृत्त केले. त्या मुळातच संहितेवर खूप काम करायच्या. त्यामुळे वाचनंही त्यामानाने कमी व्हायची. आमचे आम्ही पाठांतर करायचो आणि तेही चोख व्हायचे. त्यांच्या या अनोख्या पद्धतीमुळे आम्ही कोणीच आमची वाक्यं कधीच विसरलो नाही किंवा कधी जास्तीची वाक्यंही घेतली नाहीत, म्हणूनच त्या दिग्दर्शक म्हणून वेगळ्या ठरतात.
मला आठवते, 'महासागर' नाटकात मी चंपू साकारत होते. तेव्हा एकदा बाई म्हणाल्या होत्या, 'तू किती उंच आणि शिडशिडीत दिसतेस. चंपू अशी कशी दिसेल?' मग ती ओझ्याने वाकली असली, असे समजून मी खांदे वाकवायला लागले. दोन-तीन वेळा मी तशी तालीम केली. पण बाई काहीच बोलल्या नाहीत. मग मी पुन्हा सरळ झाले. त्यांनी तालीम थांबवली. काल जे करत होतीस ते आज का नाही केलंस?, असे त्यांनी विचारले. मी म्हणाले, 'तुम्ही काही बोललाच नाहीत; म्हणून मला वाटलं ते बरोबर नाही.' त्या म्हणाल्या, 'बरे झाले तर मी बोलणार नाही. चुकले तरच सांगणार आहे. मी बोलले नाही याचा अर्थ ते बरोबर होते.' मी बरोबर विचार करत होते हा आत्मविश्वास मला त्यावेळी मिळाला. त्या कधीच रागावल्या नाहीत. त्यांचा कधी आवाज चढला नाही. मृदू आवाजात, भाषेत बोलायच्या. त्यांच्या नाटकात 'सिच्युएशनल विनोद' व्हायचे ना, तेव्हा त्या खळखळून हसायच्या...अगदी डोळ्यांतून पाणी येईपर्यंत. आणि तशाच भावनिक प्रसंगांना रडायच्याही. त्या कलाकारांना त्या-त्या व्यक्तिरेखेचा विचार करायला लावण्याच्या प्रक्रियेपर्यंत घेऊन जायच्या. आपले संपूर्ण शरीर कोणीतरी दुसरीच व्यक्ती होते आहे, हा अनुभव फक्त बाईंसोबतच येऊ शकतो. 'तुम्ही ते शोधा म्हणजे तुम्हाला ते कधीच विसरायला होणार नाही,' असे त्या नेहमी म्हणायच्या. त्यांची ही समजावण्याची पद्धत अनोखी होती. कोणत्याही कलाकृतीत नटांचे योगदान त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. कारण त्या स्वत: अभिनेत्री होत्या. मात्र त्यांच्यातील अभिनेत्री दिग्दर्शिकेत कधीच डोकावायची नाही. भूमिकेचा अभ्यास खऱ्या अर्थाने मी बाईंकडून शिकले. आजही मला एखाद्या भूमिकेसाठी विचारले गेले, की मी तिच्या बाह्यरूपात फारशी जात नाही; कारण ते नंतर जमून जाते. सर्वप्रथम ती व्यक्तिरेखा आतून कशी असेल; हे मी समजून घेते. ही सवय त्यांच्यामुळेच माझ्यात रुजली.
बाईंचे 'सावित्री' हे नाटक काळाच्या खूप पुढचे होते. प्रेक्षकांनी म्हणावे तसे ते स्वीकारले नाही. बाईंनी पाच प्रयोगांनंतर नाटकाचा शेवट बदलला होता. या नाटकाच्या वेळी त्यांना बराच मानसिक त्रास झाला. पण तो त्रास त्यांनी नटांपर्यंत कधीच पोहोचू दिला नाही. एखादे शिल्प उभे राहावे, तसे त्या नाटक उभे करायच्या. खरेच... बाईंचे नाटक हे शिल्प आहे आणि त्या त्याच्या शिल्पकार! एखाद्या व्यक्तीत वेगळ्याच पद्धतीचे तेज असते. तसे बाईंमध्ये बुद्धी, कर्तृत्व आणि भावनिक तेज होते. त्यांच्या नाटकावरील प्रेमामुळेच विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे, डॉ. श्रीराम लागू यांच्यासह त्यांनी रंगायन संस्था स्थापन केली. या संस्थेचे मराठी नाट्यविश्वात किती मोलाचे योगदान आहे, हे आपण सर्व जाणतोच. 'हमीदाबाईची कोठी'मध्ये खरे तर मेलोड्रामा होता. पण त्यांनी तो कमी केला. जितके जास्त स्वाभाविक होईल; तितके त्यांनी ठेवले. कोणताही मेलोड्रामा न करता ते नाटक त्या योग्यरीत्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायच्या. नाटकाचा, व्यक्तिरेखांचा उद्देश ही त्यांची बलस्थाने होती. 'काहीच जमत नाही, तर नट व्हा'; असा एकंदरीतच आपल्याकडे समज असायचा, पण त्यांनी नट म्हणजे काय हे शिकवले. नटाला त्यांनी दर्जा मिळवून दिला. मी आता वेगवेगळ्या माध्यमांत काम करते, पण कोणत्याही माध्यमांत काम करा, अभिनय यायलाच हवा. हे बाईंनीच शिकवले. आमच्या पिढीतल्या कलाकारांना त्यांनी सकस नट बनवले. त्यामुळेच आम्हाला आता कोणत्याच माध्यमाची भीती वाटत नाही, दडपण येत नाही.
माझ्या वैयक्तिक आयुष्यात त्यांचे खूप महत्त्वाचे स्थान आहे. 'हमीदाबाईची कोठी'च्या वेळी पडद्यामागे त्या कशा असतात, याचे मी निरीक्षण करत बसायचे. प्रचंड एकाग्रतेने त्या काम करायच्या. नोंदी लिहिण्याचे त्यांचे काम सतत चालायचे. पुढच्या नाटकांचे काम करायच्या. त्या-त्या नाटकांसाठी आवश्यक कौशल्य असलेल्या तंत्रज्ञांना त्या घ्यायच्या. बाईंनी कुटुंबे बनवली. मी, नाना, भारती... आम्हाला त्या 'गँग' म्हणायच्या आणि आम्ही त्यांना 'गँग लीडर'! माझ्या आयुष्यातले सगळे चढ-उतार त्यांनी पाहिले. खंबीरपणे पाठिशी उभ्या राहिल्या. त्यांनी एखाद्याला 'आपले' मानले की मानले! त्यांची शिस्तबद्धता, त्यांचा आयुष्याकडे, कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन निराळा होता. या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर खूप प्रभाव आहे.
बाईंसोबत मी आता-आतापर्यंत शिबिरे केली. आता मराठी मनोरंजनविश्वात असणारे अनेक आघाडीचे तरुण कलाकार त्यात होते. ते सगळे त्यांना 'परीराणी' म्हणायचे. कारण त्या सगळ्यांना तसेच जादूई क्षण द्यायच्या. त्यांच्यात एक लहान मूल दडलेले होते. त्या निरागस होत्या आणि त्याचबरोबर हुशारही. आम्ही त्यांचे वाढदिवस साजरे करायचो. त्यांना फोटो काढायला खूप आवडायचे. आईस्क्रीम खाण्यासाठी तर त्या कधीही तयार असायच्या. माझे घर समुद्राला लागून असल्यामुळे त्या माझ्याकडे खास सूर्यास्त पाहायला यायच्या... अगदी शेवटपर्यंत.
बाईंनी माझी काही इतर नाटके पाहिली. आवडलेल्या, नावडलेल्या गोष्टीही सांगितल्या. पण दोन प्रसंग मला आजही आठवतात. मी अनेक वर्षांनी 'हमीदाबाईची कोठी' हे नाटक पुन्हा केले होते. त्यात मी आधीच्या 'हमीदाबाई'च्या वेळच्या गाण्याच्या दोन ओळी गायचे. या नाटकाच्या एका प्रयोगाला त्या आल्या होत्या. ते गाणे ऐकून, जुन्या आठवणी जाग्या झाल्यामुळे त्यांना अश्रू अनावर झाले. त्यानंतर मी दिग्दर्शित केलेले 'महासागर' त्या पाहायला आल्या होत्या. त्यावेळी मला भेटून माझ्या कामाविषयी त्या भरभरून बोलल्या होत्या.
मला बाईंचा सहवास ५०-६० वर्षं लाभला. माझी ती दुसरी आईच आहे. माझ्या आयुष्यातल्या एका कठीण काळात मी गळून गेले होते. माझी तशी अवस्था पाहून माझ्या आईनं बाईंना फोन केला. एके दिवशी सकाळी बाई घरी आल्या. त्यांना पाहून मी उठले. त्यांना घट्ट मिठीच मारली आणि रडायला लागले. त्यांनीही भावूक होऊन काही क्षण मला हृदयाशी धरून ठेवले. तेव्हा माझी आई म्हणाली, 'आता नीना बरी होईल'. माझ्या त्या अवस्थेवरचे औषध म्हणजे बाई आहेत, हे माझ्या आईला समजले होते. बाई म्हणाल्या, 'आता रडायचं नाही. चला, कामाला लागायचंय'... आणि त्यांनी मला 'सावित्री' हे नाटक दिले. त्या संहिता घेऊनच आल्या होत्या.
अशा या माझ्या बाई. धीर देणाऱ्या, उभारी देणाऱ्या, माणसे जोडणाऱ्या, कलाकारांना घडवणाऱ्या आणि भरभरून प्रेम देणाऱ्या...! वाहता झरा होत्या त्या... आणि त्या झऱ्याचा मी आनंद घेतला आहे. एका गोष्टीचे समाधान आहे, ते म्हणजे त्या शेवटपर्यंत आनंदी होत्या. दिग्दर्शिकेच्या रूपात त्या माझ्या आयुष्यात आल्या आणि कधी माझ्या गुरू, आई, मैत्रीण झाल्या कळलेही नाही. त्यांच्या हव्याहव्याशा वाटणाऱ्या सहवासाच्या आठवणी मनाच्या एका खास कोपऱ्यात मी जपून ठेवल्या आहेत.
(लेखिका ज्येष्ठ अभिनेत्री आहेत.)
शब्दांकन : चैताली जोशी

