मॉस्को: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्वत:ची ओळख अतिशय मजबूत आणि तंदुरुस्त नेते अशी ठेवली आहे. ते कधी घोडेस्वारी करताना दिसतात, तर कधी आईस हॉकी खेळताना दिसतात. शरीरावर विशेष कष्ट घेणाऱ्या पुतीन यांनी आता वाढत्या वयाला मात देण्यासाठी आणि मानवी आयुष्य वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.
त्यासाठी विज्ञानाचा आधार घेतला जात आहे. शास्त्रज्ञांनी यासाठी एका विशेष प्रकल्पावर काम सुरू केलं आहे.
रशियानं २०२४ मध्ये 'न्यू हेल्थ प्रिझर्व्हेशन टेक्नॉलॉजीज' नावाचा एक राष्ट्रीय कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यावर २६ अब्ज डॉलर्स खर्च केले जाणार आहेत, अशी माहिती वॉल स्ट्रीट जर्नलनं दिली आहे. मानवाला दीर्घायुष्य देईल आणि शरीरातील निकामी झालेले अवयव बदलता येतील असं तंत्रज्ञान विकसित करणं हा या कार्यक्रमाचा हेतू आहे.
गेल्या वर्षी चीनमध्ये झालेल्या एका लष्करी संचलनालयाला पुतीन आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात संवाद झाला होता. त्यावेळी याची झलक दिसली होती. 'मानवी अवयवांचं प्रत्यारोपण केलं जाऊ शकतं. त्यामुळे माणसं तरुण होऊ शकतात. कदाचित अमरदेखील होऊ शकतात,' असं पुतीन म्हणाले होते. त्यावर शतकाच्या अखेरपर्यंत माणसाचं अवयव १५० पर्यंत पोहोचू शकेल, असं जिनपिंग यांनी म्हटलं होतं.
रशियाचे शास्त्रज्ञ नेमकं काय करताहेत?
रशियाच्या प्रकल्पात प्रामुख्यानं २ तंत्रांवर सर्वाधिक काम करत आहेत. यातील पहिलं तंत्र बायोप्रिंटिंग म्हणजेच थ्रीडी प्रिंटरच्या मदतीनं अवयवांची निर्मिती करणं. दुसरं तंत्र म्हणजे मिनी पिग्जच्या आत मानवी अवयव विकसित करणं. जेणेकरुन भविष्यात गरज भासल्यास त्यांचं प्रत्यारोपण केलं जाऊ शकेल. २०३० पर्यंत मानवी अवयवांच्या प्रत्यारोपणाला व्यावहारिक रुप देण्याचा रशियन सरकारचा प्रयत्न आहे. रशियानं नुकतंच जीन थेरेपीवरही काम सुरू केलं आहे. कोशिकांची वय वाढवण्याची प्रक्रिया संथ करणं हा यामागील उद्देश आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं नेतृत्त्व पुतीन यांचे निकटवर्तीय करत आहेत. त्यात पुतीन यांची कन्या मारिया वोरोंतसोवाचा समावेश आहे. एंडीक्रोनोलॉजिस्ट आणि मेडिकल रिसर्च यांच्याशी संबंधित सरकारी कार्यक्रमांवर नजर ठेवून आहे. या सोबतच मिखाइल कोवाल्चुकदेखील सगळ्या घडामोडींवर, संशोधनातील प्रगतीवर लक्ष ठेवत आहेत. दीर्घायुष्य रणनीतीचे प्रमुख शिल्पकार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.

