म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या मान्सूनचा दुसऱ्या दीर्घकालीन पूर्वानुमानामध्ये राज्यातील पावसाचे चित्र अधिक स्पष्ट झाले असून, संपूर्ण पावसाळाभर राज्यात सरासरीहून मोठ्या फरकाने कमी पाऊस पडेल असा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सरासरीइतका पाऊस पडू शकेल. कोकणामध्येही सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. जून महिन्यातही राज्यात पाऊस सरासरीहून कमी असेल.
३० टक्क्यांपेक्षा फरक
राज्यात पावसाची तूट जाणवायला जूनपासूनच सुरुवात होईल. या महिन्यात आग्नेय सीमेचा काही भाग वगळता अतिरिक्त पाऊस नोंदला जाण्याची शक्यता नसल्याचे भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजावरून दिसत आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत सरासरीइतका पाऊस असू शकेल. मात्र, सर्वसाधारणपणे कोकणासारख्या विभागात पावसाच्या पहिल्या दोन महिन्यांमध्ये भरपूर पाऊस पडतो. काही वेळा या विभागात अतिरिक्त पाऊस नोंदला जातो. मात्र यंदा जूनमध्ये कोकण विभागातही ३३.५ ते ४५ टक्के यादरम्यान पावसाची तूट असेल. या कालावधीत पावसाकडून दिलासा नसल्याने तापमानदिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. जूनमध्ये कोकण विभागात सरासरीहून अधिक कमाल तापमान नोंदले जाईल, तर मध्य महाराष्ट्रात याचे प्रमाण सरासरीहून मोठ्या फरकाने अधिक असू शकते.
पुढील सात दिवसांत मान्सूनचा प्रवेश
दरम्यान, देशात मान्सून पुढील सात दिवसांत कोणत्याही क्षणी दाखल होऊ शकतो, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. सध्या नेमकी तारीख सांगता येत नसली तरी केरळ आणि दक्षिण भारतातील काही भाग असेही पुढील आठवड्यात मान्सूनच्या प्रभावाखाली येतील, 'आयएमडी' ने स्पष्ट केले.पालघर, ठाण्याला 'यलो अलर्ट'
मुंबईमध्ये रविवारपासून तीन दिवस हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. पालघर, ठाणे जिल्ह्यासाठी रविवारी हलक्या ते मध्यम सरी आणि सोमवारी मेघगर्जनेसह पावसाचा 'यलो अॅलर्ट' देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथेही सोमवार, मंगळवारी मेघगर्जनेसह पावसाचा 'यलो अलर्ट' आहे.
