Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Weather Update: ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे,  पूर्वमान्सूनच्या सरींनंतर मेघगर्जनेसह कोसळणार; महाराष्ट्रात कुठे-कुठे पावासची शक्यता?

Weather Update: ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे, पूर्वमान्सूनच्या सरींनंतर मेघगर्जनेसह कोसळणार; महाराष्ट्रात कुठे-कुठे पावासची शक्यता?

.टा. प्रतिनिधी, मुंबई/नाशिक: मे महिन्याच्या अखेरच्या दिवशी मुंबईकरांना पावसाने सुखद धक्का दिला. नैऋत्य मोसमी पावसाच्या अधिकृत आगमनापूर्वीच रविवारी सकाळी शहरासह उपनगरांमध्ये पूर्वमान्सूनच्या सरी कोसळल्या.

पहाटेपासून दाटून आलेले ढग, गार वारा आणि त्यानंतर झालेल्या पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला. तर, कल्याणमध्येही पहाटे पावसाने जोरदार हजेरी लावली.

मुंबईत रविवारी पाऊस

रविवारी सकाळी पवई, कुर्ला, शीव, दादर, माटुंगा, घाटकोपर, विक्रोळी, सांताक्रूझ, दहिसर आदी भागांत हलक्या ते मध्यम पाऊस झाला. काही भागांत पावसाचा जोर वाढल्याने रस्त्यांवर पाण्याचे प्रवाह दिसून आले. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. महापालिकेच्या आकडेवारीनुसार, सकाळी ६ ते ९ या तीन तासांत शहर विभागात सरासरी ०.६१ मिमी पावसाची नोंद झाली. पूर्व उपनगरांमध्ये सरासरी ५ मिमी, तर पश्चिम उपनगरांमध्ये २ मिमी पाऊस पडला. चेंबूरमधील कलेक्टर्स कॉलनी महापालिका शाळा परिसरात सर्वाधिक २७ मिमी पावसाची नोंद झाली. मानखुर्द अग्निशमन केंद्र आणि वैभवनगर महापालिका शाळा परिसरात प्रत्येकी २२ मिमी, महाराष्ट्रनगर महानगरपालिका शाळेत १७ मिमी पाऊस झाला. पश्चिम उपनगरांमध्येही बीकेसी अग्निशमन केंद्र परिसरात २२ मिमी, सांताक्रूझ स्वच्छता कार्यशाळा परिसरात १७ मिमी, तर गजदरबंध वादळपाणी उपसा केंद्र परिसरात १२ मिमी पावसाची नोंद झाली.

४ दिवस यलो अलर्ट

भारतीय हवामान विभागाने मुंबईतील काही भागांत १ जून ते ४ जूनदरम्यान मेघगर्जनेसह हलक्या पावासाची शक्यता वर्तवली आहे. शहरता यलो अलर्ट देण्यात आला आहे. पण तरी मान्सून अद्याप लांबणीवरच राहिल. मुंबईत 11 जूनपासून मोसमी पावसाला सुरूवात होईल असा अंदाज आहे.

सोमवारी नाशिकमध्ये मुसळधारेची शक्यता

जिल्ह्यात सोमवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यासह घाटमाथ्यासाठी भारतीय हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, काही ठिकाणी ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

अरबी समुद्रातून येणारे दमट वारे आणि वातावरणातील वाढलेली आर्द्रता यामुळे उत्तर महाराष्ट्र, घाटमाथा आणि लगतच्या भागांत पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, तसेच पश्चिमेकडील डोंगराळ पट्ट्यात जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वी शनिवार आणि रविवारी पावसाचा यलो अलर्ट दिला होता. रविवारी (दि. ३१) सायंकाळपासून पुन्हा सोमवारी दिवसभराकरिता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. याशिवाय २ ते ४ जून या काळात यलो अलर्ट असणार आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims