कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराच्या दिशेने वाटचाल सुरु झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भारतीय जनता पक्षाने २९३ पैकी १५० जागांवर आघाडी घेतली आहे, तर तृणमूल काँग्रेसला ९२ जागांवर लीड मिळाली आहे.
त्यानुसार १४७ ची मॅजिक फिगर गाठण्यास तृणमूलला अपयश येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भवानीपूर येथे खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पिछाडीवर आहेत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारावेळी भेट दिलेल्या झारग्राम भागातही कमळ फुलण्याची चिन्हं आहेत.
सुरुवातीच्या कलात आघाडी
२०२६ च्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीतील प्राथमिक कलानुसार, पश्चिम बंगालच्या झारग्राम भागाअंतर्गत येणाऱ्या चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाने सुरुवातीला आघाडी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच या भागात प्रचारानिमित्त भेट देत झालमुरी खालल्यानंतर हा परिसर चर्चेत आला होता. निवडणूक अधिकाऱ्यांनी हे केवळ प्राथमिक कल असल्याचं सांगत मतमोजणीच्या विविध फेऱ्या जसजशा पुढे सरकतील, तसतसे अंतिम चित्र समजणार असल्याचं स्पष्ट केलं.मोदींची दहा रुपयांची झालमुरी खरेदी
१९ एप्रिल २०२६ रोजी, पश्चिम बंगालच्या प्रचार दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारग्राम येथे अनपेक्षितपणे थांबून भेट दिली. या भागात निवडणूक सभांना संबोधित केल्यानंतर मोदींनी स्थानिकांशी संवाद साधला. बिक्रम साऊ नावाच्या एका फेरीवाल्याकडून 'झालमुरी' या मुरमुऱ्यांपासून बनणाऱ्या एका लोकप्रिय आणि तिखट पदार्थाची चव चाखली. मोदींनी या पदार्थासाठी १० रुपयेही मोजले.दोघांमधील छोटासा संवाद सोशल मीडियावर वेगाने पसरला आणि राज्यातील निवडणूक प्रचारादरम्यान सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या क्षणांपैकी एक ठरला.
या निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल हे सर्वाधिक चुरशीची लढत होत असलेल्या राज्यांपैकी एक म्हणून कायम ठरलं. अनेक मतदारसंघांमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात अटीतटीची स्पर्धा पाहायला मिळत आहे.
झारग्रामकडे देशाचं लक्ष
अलिकडील प्रचार मोहिमेत मिळालेलं विशेष लक्ष आणि भाजपला सुरुवातीलाच मिळालेली गती यामुळे मतमोजणी जसजशी पुढे सरकत आहे, तसतसे 'झारग्राम' हा बारकाईने लक्ष ठेवण्यासारख्या भागांपैकी एक झाला आहे.

