Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
World Cup 2027 : वनडे वर्ल्डकपसाठी BCCIचा मास्टरप्लॅन, मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूचा बॅकअप प्लॅन म्हणून विचार, नेमका कोण?

World Cup 2027 : वनडे वर्ल्डकपसाठी BCCIचा मास्टरप्लॅन, मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूचा बॅकअप प्लॅन म्हणून विचार, नेमका कोण?

मुंबई : आगामी वनडे वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर सर्व संघ तयारीला लागले आहेत. बीसीसीआय संघबांधणीचे सर्व पर्याय वापरून पाहत आहे. मागील वर्ल्डकपमध्ये संपूर्ण स्पर्धेत अजिंक्य राहणाऱ्या भारताला अंतिम सामन्यात परभव स्वीकारावा लागला होता.

२०११ नंतर भारताला अद्याप ट्रॉफी जिंकता आलेली नाही. भारताचे स्टार खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहलीसुद्धा हा वर्ल्डकप खेळून निवृत्त होतील असं बोललं जात आहे. १६ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी बीसीसीआय तगडा संघ तयार करत आहे. अशातच एक बातमी समोर आली आहे की भारतीय वनडे संघातील खेळाडू श्रेयस अय्यर याच्यासाठी बॅकअप खेळाडू म्हणून टी-२० संघातील खेळाडूला विचारात घेतले जात आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, २०२७ च्या वनडे वर्ल्डकपच्या प्लॅनिंगमध्ये बीसीसीआय तिलक वर्माला श्रेयस अय्यरचा बॅकअप म्हणून तयार करण्याचा विचार सुरू केला आहे. तिलक वर्मा हा मुंबई इंडियन्सकडून खेळतो. आयपीएल प्रदर्शनानंतर त्याने टी-२० संघात आपली जागा पक्की केली होती. आता तो संघाचा उपकर्णधार आहे. मॅनेजमेंटचा मिडल ऑर्डरसाठी एक विश्वासार्ह पर्याय उभा करण्यावर भर आहे, आणि टॉप-६ मधील श्रेयसच्या जागेसाठी तिलकचे नाव आघाडीवर आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सध्याच्या वनडे संघात उजव्या हाताच्या फलंदाजांची संख्या जास्त असताना तिलक डावखुरा असल्याने संघात लेफ्ट-राईट कॉम्बिनेशनमुळे बॅलन्स येईल.

रिपोर्टमध्ये असंही आहे की, तिलककडे केवळ एक फलंदाज म्हणून नाही, तर एक अतिरिक्त बॉलिंग ऑप्शन म्हणून पाहिले जात आहे. त्याच्या ऑफ-स्पिन गोलंदाजीमध्ये क्षमता असल्याचं टीम मॅनेजमेंटला वाटत असून, तो टॉप ऑर्डरमध्ये ४ ओव्हरची जबाबदारी सांभाळू शकल्यास संघाचा मोठा फायदा होईल.

खरी तयारी न्यूझीलंड दौऱ्यापासून

२०२७ वर्ल्डकपचं अंतिम नियोजन न्यूझीलंड दौऱ्यापासून अधिक स्पष्ट होणार आहे. कारण आशियाई क्रीडा स्पर्धेमुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत भारताचे प्रमुख खेळाडू खेळण्याची शक्यता कमी आहे. सध्या मिडल ऑर्डरसाठी सक्षम बॅकअपची कमतरता असल्याची खंत टीम मॅनेजमेंटमध्ये आहे. बीसीसीआयमधील एका सूत्रानुसार, कोच गौतम गंभीर आणि कर्णधार शुभमन गिल यांनाही याची पूर्ण कल्पना आहे. याशिवाय हार्दिक पांड्या आणि नितीश कुमार रेड्डी यांच्या दुखापतीचा धोका पाहता, फलंदाजीसोबत किमान चार षटके टाकू शकेल असा खेळाडू टॉप ऑर्डरमध्ये असणं गरजेचं आहे. गेल्या एका वर्षात प्लेइंग-११ चा समतोल साधण्यासाठी पाचव्या-सहाव्या क्रमांकावर अनेकदा वॉशिंग्टन सुंदर किंवा अक्षर पटेलला संधी द्यावी लागली आहे. मात्र २०२७ चा वर्ल्डकप दक्षिण आफ्रिकेच्या परिस्थितीत होणार असल्याने, तिथल्या कंडिशनला साजेसे पर्याय आतापासूनच तयार ठेवणं महत्त्वाचं मानलं जात आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims