मुंबई: गेल्या काही वर्षात मराठी सिनेमांची चर्चा देशभरात झाली. मराठी कलाकार, सिनेमांचे विषय हे इतर इंडस्ट्रीतल्या निर्मात्यांना आकर्षित करत असल्याचं सकारात्मक चित्र आहे. आता साऊथ सिनेइंडस्ट्रीतल्या बड्या निर्मात्यानं मराठी सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री केली आहे.
भारतीय सिनेसृष्टीत 'KGF', 'Kantara', आणि 'Salaar' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे प्रसिद्ध दाक्षिणात्य प्रॉडक्शन हाऊस 'होम्बळे फिल्म्स' आता मराठी मनोरंजन विश्वात पाऊल ठेवत आहे. होम्बळे फिल्म्सनं आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाची अधिकृत घोषणा केली असून, या चित्रपटाचं नाव 'येतो का नाय' (Yeto Ka Naay) असं आहे. हा चित्रपट केवळ मराठीच नव्हे, तर हिंदीत 'YKN - Pehla Vaar' या नावानं एकाच वेळी प्रदर्शित होणारा एक द्विभाषिक चित्रपट असेल.
मुंबईच्या गल्लीतली गोष्ट आणि हिप-हॉपची झिंग
'येतो का नाय' हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील पहिलाच भव्य हिप-हॉप म्युझिकल' चित्रपट ठरणार आहे. मुंबईच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या या चित्रपटात आजच्या तरुण पिढीची म्हणजेच Gen Z मानसिकता, त्यांची मैत्री, प्रेम, संघर्ष, स्पर्धा आणि स्वतःची ओळख शोधण्याचा भावनिक प्रवास पाहायला मिळणार आहे.चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलें आहे की, "द बीट ड्रॉप्स. द रायव्हलरी बिगिन्स. कॅन द ब्रदरहुड बाँड सस्टेन? मुंबईच्या गल्लीतली रावस गोष्ट..! #YetoKaNaay / YKN - PEHLA VAAR."
तगडी टीम
या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा मराठी डिजिटल जगतातील प्रसिद्ध दिग्दर्शक सारंग संजीव साठे (भारतीय डिजिटल पार्टी - भाडिपा फेम) यांनी सांभाळली आहे. चित्रपटाच्या लेखनातही त्यांची महत्त्वाची भूमिका आहे.
या चित्रपटाची कथा सारंग संजीव साठे, लेखक , रॅपर आणि 'अतिशय युनिक' सुजय जाधव, सृष्टी तावडे आणि श्रेयस सगवेकर यांनी एकत्र लिहिली आहे. चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफी हर्षवीर ओबेरॉय यांनी सांभाळली आहे, तर संगीत एवी प्रफुल्लचंद्र यांनी दिलं आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग मुंबईमध्ये सुरू असून, याच वर्षी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता
सध्या या चित्रपटाचं शूटिंग मुंबईमध्ये वेगानं सुरू असून, हा चित्रपट याच वर्षाच्या (२०२६) उत्तरार्धात प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. चित्रपटातील कलाकारांची नावे अजूनही गुपित ठेवण्यात आली असली, तरी सृष्टी तावडे आणि श्रेयस सगवेकर यांच्या लेखनातील सहभागामुळं चित्रपटात अस्सल मुंबईया रॅप आणि हिप-हॉप संस्कृतीची मेजवानी मिळणार हे नक्की!
आम्ही सातत्यानं अशा कथा सांगण्याचा प्रयत्न करतो ज्या प्रत्येक पिढीशी जोडल्या जातात आणि भारताच्या बदलत्या सांस्कृतिक वातावरणाचे प्रतिबिंब दाखवतात. 'येतो का नाय' ही एक नवी आणि समकालीन कथा आहे, जी संगीत, मैत्री, महत्त्वाकांक्षा आणि आत्म-अभिव्यक्तीच्या माध्यमातून थेट Gen Z शी जोडली जाते.
चालुवे गौडा, सह-संस्थापक होम्बळे फिल्म्स

