Saturday, 23 Jan, 12.35 pm Maharashtra update

Posts
बीएचआर घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई ! सुनील झंवर यांच्या मुलाला अटक

पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी म्हणजेच बीएचआर पतसंस्था यामध्ये कोट्यवधी रुपयांच्या घोटाळा करण्यात आला होता. बीएचआर पतसंस्थेत अवसायक जितेंद्र कंडारे व व्यावसायिक सुनील झंवरने ठेव पावत्यांचे मॅचिंग, संस्थेच्या मालमत्तांची कवडीमोल दरात विक्री व खरेदी असे व्यवहार करून कोट्यवधींचा अपहार केला होता.

या प्रकरणी पुणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुशंगाने नोव्हेंबर महिन्यात पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकून चौकशीला सुरुवात केली होती. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करताना दोघा चार्टर्ड अकाउंटंटसह चौघांना अटक केलेली आहे. तर गुन्हा दाखल झाल्यापासून अवसायक जितेंद्र कंडारे व सुनिल झंवर पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. दरम्यान, या प्रकरणात अटकेत असलेले सीए महावीर जैन यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. अन्य संशयित सीए धरम सांखला, विवेक ठाकरे व सुजीत वाणी यांच्या जामीन अर्ज दाखल केला होता. २७ जानेवारी ला यावर सुनावणी होणार आहे.

भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर पतसंस्थेतील कथित गैरव्यवहार प्रकरणात प्रमुख सूत्रधार सुनील झंवर महिनाभरापासून पोलिसांना हुलकावणी देत आहे. दुसरीकडे आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी सायंकाळी सुनील झंवरचा मुलगा सूरज झंवर याला अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता सुनील झंवरने नाशिकच्या मांडसांगवी येथील १०० कोटींची जमीन स्वस्तात घेतल्याच्या तक्रारीबात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर अपर महसूल सचिवांनीही प्रकरणाची दखल घेतल्याने झंवरच्या अडचणी वाढल्या आहेत. या कारवाईनंतर लवकरच सुनील झंवर हाती लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान या प्रकरणातील उद्योजक सुनील झंवर माजी मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असल्याने तासेच यामध्ये माजी मंत्री गिरीश महाजन यांचे लेटर पॅड सापडल्याची जोरदार चर्चा झाल्याने या प्रकरणाचे धागेदोरे महाजनांपर्यंत जावून पोहचतात की काय? अशी शक्यता निर्माण झाली होती मात्र त्यांनतर आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकारी यांनी कागदपत्रे हस्तगत केली. मात्र, ती कुणाशी संबधित आहेत, ते आताच सांगता येणार नसल्याची माहती दिली होती.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra update
Top