Sunday, 24 Jan, 12.06 pm Maharashtra update

Posts
दिल्लीच्या शेतकरी आंदोलना समर्थनार्थ किसान सभेकडून १५ हजार शेतकऱ्यांचा नाशिक ते मुंबई भव्य वाहन मोर्चा !

नाशिक: केंद्र सरकारने केलेले कॉर्पोरेट धार्जिणे व शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा व शेतीमालाला आधार भावाचे कायदेशीर संरक्षण द्या या मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला निर्णायकरित्या आणखी व्यापक करण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शनिवारी नाशिक ते मुंबई असा १५,००० शेतकऱ्यांचा भव्य राज्यव्यापी वाहन मोर्चा सुरु करण्यात आला आहे. नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथून नेताजी सुभाष चंद्र बोस जयंतीदिनी, सायंकाळी हा मोर्चा सुरू झाला.

त्यापूर्वी झालेल्या उत्साही जाहीर सभेस किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, जमसंच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे, माकपचे आमदार व सीटूचे राज्य सचिव विनोद निकोले, किसान सभेचे राज्य अध्यक्ष किसन गुजर, सरचिटणीस डॉ. अजित नवले, सहसचिव सुनील मालुसरे, डीवायएफआयच्या राज्य सरचिटणीस प्रीती शेखर आणि एसएफआयच्या राज्य उपाध्यक्ष कविता वरे यांनी संबोधित केले. नाशिक येथून निघालेला हा वाहन मार्च इगतपुरीजवळ घाटनदेवी येथे रात्री मुक्कामी थांबला. येथे राज्यातून जास्त शेतकरी सामील झाले. त्यांनतर आज सकाळी वाजता घाटनदेवी येथून निघून हे हजारो शेतकरी कसारा घाट उतरून मुंबईच्या दिशेने कूच करतील.

दिल्लीतील शेतकरी आंदोलन तीव्र करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने देशभर ते 26 जानेवारी या काळात सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये राज्यपाल भवनांवर आंदोलन करण्याची हाक दिली आहे. मुंबई येथील आझाद मैदान येथे आज सुरू करण्यात येत असलेल्या महामुक्काम सत्याग्रहात सामील होण्यासाठी किसान सभेचा हा वाहन मोर्चा आज दुपारी सामील होईल.

राज्यभरातील पेक्षा अधिक संघटनांच्या वतीने संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या झेंड्याखाली मुंबईतील हे महामुक्काम आंदोलन होणार आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती (महाराष्ट्र), कामगार संघटना संयुक्त कृती समिती (महाराष्ट्र), जन आंदोलनांची संघर्ष समिती (महाराष्ट्र), नेशन फॉर फार्मर्स (महाराष्ट्र) आणि हम भारत के लोग (महाराष्ट्र) या पाच मंचांनी मिळून संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा तयार केला आहे.

यामध्ये दिनांक २५ जानेवारी रोजी आझाद मैदान येथे सकाळी वाजता प्रचंड सभा होईल. महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते शरद पवार, बाळासाहेब थोरात आणि आदित्य ठाकरे, डावे व लोकशाही पक्ष यांचे प्रमुख नेते आणि अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि दिल्लीतील आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाचे एक प्रमुख नेते माजी खासदार हनन मोल्ला या सभेस संबोधित करतील. सभेनंतर येथे जमलेले हजारो श्रमिक दुपारी वाजता राज भवनाकडे कूच करतील व प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यपालांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करतील.

शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, शेतीमालाला आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करा, वीज विधेयक मागे घ्या, कामगार संहितेमधील कामगार विरोधी बदल रद्द करा, वनजमीन तथा देवस्थान, गायरान, आकारीपड, बेनामी व वरकस जमीन कसणारांच्या नावे करा आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू करून सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्या, या मागण्या आंदोलनात करण्यात येणार आहेत. 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी सकाळी मुंबईच्या आझाद मैदानावर राष्ट्रध्वज फडकवून, राष्ट्रगीत गाऊन आणि शेतकरी-कामगारांचे हे आंदोलन विजयी करण्याचा निर्धार करून या महामुक्कामाची सांगता होईल.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra update
Top