Posts
एमआयएम खा.इम्तियाज जलील यांचे ‘आय लव तिरुपती’

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात सध्या लव औरंगाबाद, नमस्ते संभाजीनगर, सुपर संभाजीगरच्या फलकावरून वाद सुरू आहे. औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करावे, अशी मागणी सध्या शिवसेना, भाजप, मनसे यांनी उचलून धरली आहे. त्यातच लव औरंगाबादचे फलक फोडणे, संभाजीनगर फलक असलेल्या बसच्या तोडफोडीमुळे शहरातील वातावरण बिघडण्याची भीती देखील होती. या दरम्यान, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी राजकारणासाठी नामांतराचा मु्द्दा उपस्थित केल्याचे सांगत भाजप-सेनेवर टीका केली होती. मात्र, नुकताच जलील यांनी एक आय लव तिरुपती या फलकासमोर उभे राहून फोटो काढले. आणि ते सोशल मीडियावर पोस्ट केले.
केंद्र सरकारच्या शहरी विकास समितीचे पथक सध्या आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू राज्याच्या दौऱ्यावर आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे देखील या समितीचे सदस्य असल्याने ते देखील या दौऱ्यात सहभागी झाले आहेत. केंद्र सरकारची अर्बण डेव्हलप्मेंट कमिटी सध्या आंध्र प्रदेशात आहे. समितीने तिरुपती बालाजी मंदिर परिसर आणि तेथील सुविधांची पाहणी केली. यानंतर जलील यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला. तिरुपती संस्थानकडून येथे दररोज दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना अत्यंत चांगल्या सुविधा पुरवल्या जातात, हे पाहून मला खूप समाधान वाटले, असे त्यांनी म्हटले आहे.
खासदार इम्तियाज जलील तिरुमला येथील तिरुपती बालाजी मंदिर संस्थानच्या वतीने भाविकांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधा पाहून भारावले. त्यांनी बालाजी मंदिराला भेट देऊन तेथे दररोज येणाऱ्या लाखो भाविकांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधा पाहून चांगलेच भारावले. ‘आय लव तिरुपती’च्या डिजीटल फलकासमोर उभे राहत त्यांनी फोटोही काढले.
इम्तियाज यांनी स्वतःच हा फोटो त्यांच्या फेसबुक आणि ट्विटर हॅन्डलवर पोस्ट केला आहे. हा फोटो आहे तिरुमला तिरूपती बालाजी मंदिर परिसरातला. या ठिकाणी लावण्यात आलेल्या लव तिरुपती या फलकासमोर उभे राहत इम्तियाज यांनी फोटो काढलेत. लव औरंगाबाद आणि त्यांनी काढलेल्या फोटोचा काही एक संबंध नाहीये. पण सध्या औरंगाबाद शहरात सुरू असलेल्या वादामुळे अनेक जण या फोटोकडे वेगवेगळ्या नजरेने पाहू लागलेत.