Posts
कालच्या ऐतिहासिक तेजीनंतर आज सेन्सेक्स ७०० अंकांनी गडगडला !

मुंबई: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बिडेन यांच्या शपथविधीनंतर आज सकाळी जागतिक शेअर बाजारात ऐतिहासिक तेजी आलेली दिसून आली. देशांतर्गत समभागांवर देखील याचा याचा परिणाम होऊ शकतो. यावेळी जागतिक बाजारातील सकारात्मक बाजाराच्या अनुषंगाने सेन्सेक्स गुरुवारी पहिल्यांदाच 50,000 च्या पार गेला आहे. तर निफ्टी 14,700 च्या वरच्या पातळीवर तेजीसह बाजारपेठेतील निर्देशांक नवीन उच्च पातळीवर सुरू राहिला. मात्र आज दुसऱ्या दिवशी लगेचच सेन्सेक्स ७०० अंकांनी गडगडला आहे.
गेल्या वर्षभरापासून जगभर थैमान घातलेल्या कोरोनाने जगासमोर मोठे आर्थिक आव्हाने निर्माण केली आहेत. तर सध्याचा काळ हा ती आव्हाने काही प्रमाणात दूर होताना दिसणारा आहेत. यामध्ये कोरोना आजाराचे घटते प्रमाण, लसीकरण आणि अमेरिका सारख्या महासत्ता राष्ट्रातील झालेला सत्ताबदल हे महत्वाचा परिणाम घडवून आणतात.
मात्र आज तेजीत वधारलेल्या शेअरची जोरदार विक्री करून नफावसुली झाल्याने आज शुक्रवारी सेन्सेक्समध्ये ७०० अंकांची घसरण झाली आहे. त्याशिवाय राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २०० अंकांनी कोसळला आहे. बँका, धातू, ऑटो या शेअरमध्ये विक्रीचा सपाटा सुरु आहे. या पडझडीत गुंतवणूकदारांचे किमान दोन लाख कोटी बुडाले आहेत.
गुरुवारी सेन्सेक्स ५० हजारांवर गेला होता. शेवटच्या तासात त्यात घसरण झाली होती. त्यामुळे तो गुरुवारी १५० अंकांनी घसरला होता. सध्या सेन्सेक्स ७२५ अंकांनी कोसळला असून ४८४९९ अंकावर आहे. निफ्टी २१४ अंकांनी घसरला असून १४३७९ अंकावर आहे.
आज सकाळपासून बाजारात विक्रीचा दबाव दिसून आला. आजच्या सत्रात रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, ऍक्सिस बँक, एसबीआय, एशियन पेंट्स, आयसीटी बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बँक या शेअरमध्ये घसरण झाली आहे. तर मारुती सुझुकी, इन्फोसिस, एचयूएल, टीसीएस, बजाज ऑटो हे शेअर वधारले आहेत. बँक आणि वित्त सेवा पुरवठादार कंपन्यांना आज मोठी झळ बसली आहे. गुंतवणूकदारांचे लक्ष आता अर्थसंकल्पाकडे लागले आहे.