Posts
सिरमची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…

पुणे : कोरोना प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ लसीची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या मांजरी येथील इमारतीमध्ये गुरुवारी दुपारी आग लागली होती. बीसीजी लस तयार केली जाणाऱ्या या इमारतीत लागलेल्या आगीत होरपळून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. आग लागलेल्या ठिकाणाचीपाहणी केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कोव्हिशिल्ड लसीचा प्लांट पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे.
‘लस बनवणाऱ्या केंद्रात आग लागली, आमच्या सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. दुर्दैवाने पाच जणांचा मृत्यू झाला. सुदैवाने कोव्हिशिल्ड लस सुरक्षित आहे. आग लागली तेथील दोन मजले वापरात होते. वरील ठिकाणी जिथं केंद्र सुरु होणार होतं तिथे आग लागली. सर्वांना कोरोनाच्या सुरक्षेबाबत एक शंका आणि भीती वाटत होती. मात्र कोरोना लसीला कोणताही फटका बसलेला नाही,’ अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.
पत्रकार परिषदेत सीरमचे सीईओ अदर पूनावाला देखील उपस्थित होते. ‘आगीत एक हजार कोटींपेक्षा अधिक नुकसान झाल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे. ‘इतर औषधांच्या साठ्यावर परिणाम झाला असून आमचे जे नवे प्रोडक्ट्स येणार होते, त्यांच्यावर प्रभाव पडला आहे,’ असे पूनावाला यांनी सांगितले आहे.
काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिरमला भेट दिल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सिरम मधील आग लागलेल्या ठिकाणी पाहणी केली आहे. “आगीची सखोलपणे चौकशी केली जात आहे. अहवाल येत नाही तोवर निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही,” असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं आहे.