Saturday, 14 Dec, 9.47 am महाराष्ट्र विश्व न्यूज

होम
'मानवता धर्म वाढवा, बंधूभाव मजबूत करा ' : परिसंवादातील सूर

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) - ' सर्व धर्मातील शिकवण मानवता धर्म वाढविणारी असून प्रेम, सौहार्द, बंधूभावाचे बंध मजबूत करण्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे. द्वेष निर्माण करणाऱ्यांना लांब ठेवले पाहिजे ', असा सूर शुक्रवारी सायंकाळी ' महमद पैगंबर यांची मानवतावादी शिकवण ' या विषयावरील परिसंवादात उमटला.

'सुफी- वारकरी विचार मंच'च्या वतीने इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत महमद पैगंबर यांनी सांगितलेल्या मानवता धर्मावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.

शुक्रवार दि. १३ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ६.३० वाजता आझम कॅम्पस, कॅम्प, पुणे येथील डॉ. ए. आर. शेख असेंम्बली हॉलमध्ये हा परिसंवाद झाला.

हा कार्यक्रम एम.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या परिसंवादासाठी अजमेर येथील गरीब नवाज यांच्या वंशातील हजरत सय्यद नसीरुद्दीन चिश्ती,
हजरत गुलाम नझमे फारुकी चिश्ती खास पाहुणे म्हणून उपस्थित होते.

परिसंवादामध्ये विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड, पारनेर येथील अभ्यासक डॉ. रफीक सय्यद, ज्येष्ठ नेते उल्हास पवार व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण सहभागी झाले.

यावेळी अभिनव कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप, पिंपरी चिंचवडचे माजी महापौर तात्या कदम, ह.भ.प. मच्छींद्र महाराज लांडगे (चापडगांवकर) उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजक व सुफी- वारकरी विचार मंचचे पदाधिकारी
मशकुर ए. शेख, उमर शरीफ मो. शेख, रईस चाँद शेख व नितिन गोरावडे यांनी स्वागत केले.

डॉ.रफिक सय्यद पारनेरकर म्हणाले, ' अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी पैगंबर यांना भूतलावर पाठवण्यात आले. 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ' याचा विसर पडल्याने अशा कार्यक्रमातून बंधूभाव , परस्पर प्रेम वाढवले पाहिले.

मच्छिंद्र महाराज म्हणाले,' कोणताही धर्म हा मानव जातीत भेदाभेद करायला शिकवत नाही. आपण सर्व एक आहोत, आपला देवही एकच आहे. तो विचार आचरणात आणला पाहिजे'

डॉ एस एन पठाण म्हणाले,' भारत सर्व धर्मांचे आश्रय आहे. बाहेरून जे येथे आले, ते भारतीय आहेत, आणि सुखाने नांदतात. हिंदू मुस्लिम एक होवू नयेत हा प्रयत्न ब्रिटिशांनी केला. मुस्लिमांचे चित्र नकारात्मक रंगविला जाते आहे. हे प्रयत्न दुःखदायक आहेत. आपण सद्भावना जपल्या पाहिजेत.

उल्हास पवार म्हणाले,'पैगंबर यांची शिकवण आणि माऊलींचे पसायदान देखील सर्व जगासाठी आहे. द्वेष दूर करून माणसे मनाने जोडली पाहिजेत. हे काम सुफी- वारकरी विचार मंचाने करावे.'

डॉ विश्वनाथ कराड म्हणाले,'अजमेर दर्ग्यापासून मानवतेचा संदेश सर्वत्र जातो. सर्व धर्माची शिकवण एकत्र देणारी मानवता भवने उभारली गेली पाहिजेत. अमृतसर, आळंदी, अजमेर, अयोध्या प्रेमाच्या धाग्यात जोडण्याची गरज आहे.

हजरत सय्यद नसीरुद्दीन चिश्ती म्हणाले, ' सर्वांचे ध्येय शांतता आणि सहजीवन असले पाहिजे. साडेआठशे वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांनी जे सहजीवनाचे स्वप्न पाहिले.ते पूर्ण होताना या कार्यक्रमातून दिसत आहे. ' सुफी संप्रदायाने देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन या देशावर प्रेम केले. या देशातील चालि रिती आत्मसात केल्या. प्रेम, बंधू भावाचा संदेश गावा_गावात शिक्षणाद्वारे पोहोचावा.

अध्यक्षस्थानावरुन बोलताना डॉ.पी. ए. इनामदार म्हणाले, ' सर्व धर्मात चांगल्या शिकवणुका सारख्याच आहेत. त्यावर चर्चा केली जात नाही. जिथे मतभेद आहेत, त्यावरच चर्चा केली जाते. शिक्षणाचे महत्वही सर्व धर्मात सांगीतले आहे.

सर्व संतांनी, पैगंबरांनी प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन आनंद वाटला आहे. तो आदर्श डोळयासमोर ठेऊन शिक्षणातून मानवता धर्म पुढे नेण्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे. वातावरण शिक्षणमय केल्याशिवाय शांतता येणार नाही. '

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Vishva News
Top