Wednesday, 22 Nov, 1.11 am महाराष्ट्र

बुलडाणा
अरे, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?

सुधीर चेके पाटील।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली: गत विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान भारतीय जनता पार्टीने 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?' या 'कॅचलाइन'चा प्रभावीपणे वापर करून राज्याची सत्ता मिळविली. हीच 'कॅचलाइन'आता भाजपासाठी 'बुमरँग' ठरत असून, भाजपा सरकारने शेतकर्‍यांना दिलेल्या आश्‍वासनांचा पडलेला विसर आणि शेतकर्‍यांसमोरील अनंत अडचणी, या पृष्ठभूमीवर तालुक्यातील अमडापूर येथील संतप्त शेतकर्‍यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत 'अरे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?' असा सवाल केला आहे. त्यामुळे भाजपावर त्यांचेच अस्त्न उलटल्याचे दिसते.
राज्यात भाजपाच्या फडणवीस सरकारला सत्तेत येऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या तीन वर्षात भाजपाने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळण्याऐवजी शेतकर्‍यांपुढील समस्या दिवसागणिक वाढत असल्याने शेतकर्‍यांमध्ये तीव्र रोष असून, हाच रोष व्यक्त करण्यासाठी तालुक्यातील अमडापूर येथील समाधान खेन्ते व अरुण पद्मने या दोन शेतकर्‍यांनी बसस्थानक परिसरात 'अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?' असे बॅनर लावून भाजपाला जाब विचारत आहेत. सोयाबीन, कापूस, तुरीसह इतर कडधान्याचे १0 वर्षांपूर्वीचे भाव दिल्याबद्दल तसेच शेतकर्‍यांचा माल बाजारपेठेत येण्याअगोदर विदेशातून माल बाजारपेठेत आणून शेतकर्‍यांच्या मालाचे भाव पाडल्याबद्दल, शेतकर्‍यांनी ३ वर्षात जीडीपी १२ टक्के केला; परंतु तुम्ही शेतकर्‍यांचा जीडीपी 0 टक्के केला, जगाच्या पोशिंद्याला चुकीचे धोरण राबवून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, शेतकरीविषयक चुकीचे धोरण राबवून एक पिढी बरबाद केली आणि तत्त्वत: १00 टक्के फसवी कर्जमाफी दिल्याबद्दल भाजपा सरकारचे उपहासात्मक अभिनंदन या बॅनरद्वारे या शेतकर्‍यांनी केले आहे. मध्यंतरी सोशल मीडियावरदेखील भाजपला शेतकरी व इतर मुद्यांवरून लक्ष्य करीत याच कॅचलाइनद्वारे प्रश्न उपस्थित केल्या जात होते. त्यात आता शेतकर्‍यांनी बॅनर लावून थेट सरकारला जाब विचारण्यासह '१0 वष्रे मागे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा !' असे नमूद करून आपला रोष व्यक्त केल्याने हा विषय सध्या सर्वत्र चर्चेचा ठरला आहे.

'होय मी लाभार्थी.'चीही खिल्ली
भाजपच्या 'कुठे नेऊन ठेवला..' प्रमाणेच सध्याच्या 'होय मी लाभार्थी' या जाहिरातीवरूनही अमडापूर येथील शेतकर्‍यांनी सरकारवर टीका करताना 'होय मी लाभार्थी, चुकीच्या धोरणांचे, हे माझं सरकार.' असे नमूद करून सरकारवर सडकून टीका केली आहे. याशिवाय सोशल मीडियावरदेखील सध्या 'होय मी लाभार्थी'च्या 'जोक्स'ने अक्षरश: धुमाकूळ घातलेला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra
Top