Sunday, 09 Jul, 12.59 pm महाराष्ट्र

महाराष्ट्र
चित्रपट रसग्रहणाची 'प्रभात'

- योगेश बिडवई

मराठी चित्रपट रसिकांना रसग्रहणाची ओळख करून देणारे व अत्यंत समर्पित भावनेने काम करणारे 'प्रभात चित्र मंडळ' ५ जुलैला ५० वर्षांचे झाले. 'प्रभात'ने मराठी माणसाला भारतीय, जागतिक सिनेमाचे दर्शन घडविले, चित्रपट साक्षर केले. महाराष्ट्रातील सांस्कृतिक चळवळीतील या महत्त्वाच्या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त घेतलेला हा धांडोळा...

प्रतिमा व ध्वनी यांचा संयोग म्हणजे सिनेमा. कथा सांगण्याची कला असंही सिनेमाला म्हटलं जातं. चित्रपट हे माध्यम विज्ञानाचं अपत्य असलं तरी प्रतिमा, ध्वनी, चित्रचौकटी यांद्वारे दिग्दर्शक काहीतरी सांगू पाहतो. चित्रपटातील रूपकाचा अर्थबोध झाल्यानंतर दृश्यांच्या पलीकडेही दिग्दर्शकाने सांगितलेली कथा आपल्याला उलगडू लागते. चित्रपटाचे कलात्मक मूल्य उलगडल्यानंतर आपण खऱ्या अर्थाने त्याचे रसग्रहण करू शकतो.

७०च्या दशकात मुंबईसह देशातील महानगरांमध्ये फिल्म सोसायट्या (चित्रपट मंडळ) सुरू झाल्या. मुंबईतही दोन फिल्म सोसायट्या होत्या. मराठी लोकांची हक्काची सोसायटी मात्र नव्हती. विशेषत: मराठी माणसाचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या दादर भागात सोसायटी नव्हती. त्यासाठी सिनेमाचे निस्सीम चाहते वसंत साठे, ज्येष्ठ चित्रपट समीक्षक सुधीर नांदगावकर व दिनकर गांगल आदी प्रभृतिंनी पुढाकार घेऊन ५ जुलै १९६८ रोजी प्रभात चित्र मंडळाची स्थापना केली. सुरुवातीला असलेले ३० सदस्य नांदगावकर व गांगल यांच्या प्रयत्नाने चार-पाच वर्षांत ३०० वर गेले. ठाण्यापासून मराठी माणसं प्रभातला जोडली गेली. दादरच्या चित्रा सिनेमागृहात सकाळी दोन शो व्हायचे, मात्र तेथे मर्यादित आसनव्यवस्था असल्याने बरचसे रसिक जागा मिळेल तेथे बसायचे. दादर सोडून जायचे नसल्याने तेथेच शो घेतले जात होते. पहिल्या दशकात १९७८ पर्यंत प्रभातची भरभराट झाली. प्रभातच्या दशवार्षिक सोहळ्याला तत्कालीन केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री लालकृष्ण आडवाणी यांना निमंत्रित करण्यात आले होते.

साहित्यिक, प्राध्यापक, सिनेमाचे चाहते संस्थेला जोडले गेले. प्रभातची स्थापना ही मराठी माणसासाठी सांस्कृतिक क्रांतीच ठरली. भारतीय भाषा व जगभरातील उत्तमोत्तम चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना मिळाली. चित्रपटानंतर त्यावर आस्वादक चर्चा होत असे. संवादाविना प्रतिमा, ध्वनी रूपकाद्वारे कसे संवाद साधतात, हे प्रेक्षकांना कळू लागते. त्यातून चित्रपट अधिक भावू लागला. सिनेमा कसा पाहावा? कोणते सिनेमे पाहावेत? याची माहिती मिळू लागली. जागतिक चित्रपटांची (केवळ हॉलीवूड नव्हे) ओळख होऊ लागली. भारतीय चित्रपटांतून (केवळ बॉलीवूड नव्हे) लोकजीवन उलगडू लागले. जगभरातील विविध संस्कृतींचा परिचय होऊ लागला. एक प्रकारे इतिहास, भूगोल व जगाचा पटच रसिकांना खुला झाला.

युरोपमध्ये 'न्यू वेव्ह' चळवळ आकारास येत होती. साहित्य, कला, मानवी मूल्ये यांचा सिनेमात विचार होऊ लागला. ते सिनेमे पाहायला मिळू लागले. साधारण पहिल्या तीन-चार वर्षांतच प्रभातने रसिकांना विश्वदर्शन घडविले. जॉ ल्यूक गोदार, व्हित्तोरिया द सिका, अकिरा कुरोसावा, रोमन पोलान्स्की आदी प्रतिभासंपन्न दिग्दर्शकांच्या कलाकृती पाहायला मिळू लागल्या. चित्रपटांची भाषा, त्यातील चित्रचौकटी, कथा सांगण्याची वेगवेगळी पद्धत, परिभाषा यावर चर्चा होऊ लागली. प्रभातने चित्रपट आस्वाद शिबिर घेण्यास सुरुवात केली. त्यातून प्रेक्षक अधिक प्रगल्भ झाला.

युरोपातील चळवळीचा भारतावरही प्रभाव पडला. सत्यजित राय, ऋत्विक घटक, मृणाल सेन आदी दिग्दर्शक कलात्मक सिनेमे बनवू लागले. तेही प्रभातने दाखविले. त्यानंतरच्या श्याम बेनेगल, केतन मेहता, गिरीश कासारवल्ली, मणी कौल आदींच्याही कलाकृती अभ्यासता आल्या.

१९७२ मध्ये दूरदर्शन सुरू झाले. ८२ मध्ये रंगीत टीव्ही आला. ८४ मध्ये दोन तृतीयांश भारतात टीव्ही दिसू लागला. रंगीत टीव्हीमुळे व्यावसायिक सिनेमाचा थिएटरमधील प्रेक्षक कमी झाला. फिल्म सोसायट्यांच्या चळवळीला त्याचा फटका बसला. प्रभातचे ५०० सभासद ५० वर आले. अनेक सोसायट्या बंद झाल्या, प्रभात मात्र तगली. सुधीर नांदगावकर यांच्या प्रयत्नातून ९० मध्ये 'ब्रेन स्टॉर्मिंग' सेशन घेण्यात आली. त्याचा संस्थेला फायदा झाला. ९० ते ९४ ही संस्थेसाठी कटकटीची वर्षे होती. गृहिणींसाठी दुपारी शो सुरू करण्यात आले. चित्रपट चळवळीला लिखित जोड असावी यासाठी १९९३ मध्ये 'रूपवाणी' मासिक सुरू करण्यात आले. सत्यजित राय यांना आॅस्कर मिळाल्यानंतर १९९१ मध्ये त्यांच्या २८ चित्रपटांचा महोत्सव भरविण्यात आला. महोत्सवासाठी तब्बल ८०० सभासदांची नोंद झाली.

१९८४ ते १९९४ या दशकात सोसायटी चालविण्याची अवघड जबाबदारी नांदगावकर यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी पेलली. १९९५ मध्ये जागतिक सिनेमाला १०० वर्षे पूर्ण झाली. त्यानंतर तंत्रज्ञानाचे युग आले. सर्व सोसायट्यांना एकत्र करून २००० नंतर सिनेमा डीव्हीडीद्वारे दाखविण्यात येऊ लागला. थिएटरमालक मल्टिप्लेक्सकडे वळले तर फिल्म सोसायट्या अभ्यास वर्गाकडे वळाल्या. फिल्म सोसायटी चळवळीच्या चौथ्या टप्प्यात इंटरनेटचा बोलबाला झाला. सिनेमाचे २४ तासांचे चॅनेल आले तसेच मोबाइलवर सिनेमा आला. मात्र यानंतरही प्रभात टिकून राहिली. वाशी व ऐरोली येथे शाखा सुरू करून संस्थेने ३०० सदस्य टिकविले आहेत.

कार्यक्रमांची रेलचेल

सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध ठिकाणी चित्रपट रसास्वाद शिबिरे, मराठी, आॅस्कर विजेत्या चित्रपटांचा महोत्सव, 'चित्रभारती' भारतीय चित्रपटांचा महोत्सव, महिलांसाठी विशेष चित्रपट महोत्सव, अभ्यास शिबिर, चर्चासत्र, वास्तव रूपवाणी विशेषकांचे प्रकाशन आदी कार्यक्रम होणार आहेत.

एशियन फिल्म फाउंडेशन

सुधीर नांदगावकर व किरण व्ही. शांताराम यांच्या प्रयत्नातून एशियन फिल्म फाउंडेशन सुरू झाले. मामि व एशियन फिल्म फेस्टिव्हल त्यातून सुरू झाले.

ज्येष्ठांचा सहवास

चित्रपती व्ही. शांताराम यांनी सुरुवातीला संस्थेला मोलाची मदत केली. ज्येष्ठ लेखक विजय तेंडुलकर हेसुद्धा संस्थेशी संबंधित होते. अभिनेत्री स्मिता पाटील यांचाही स्नेह होता. राज कपूर, देव आनंद आदींनीही कार्यक्रमांना उपस्थिती लावली होती. काही वर्षांपासून चित्रपट निर्माते किरण व्ही. शांताराम हे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पाहत आहेत. ते मार्गदर्शन करण्याबरोबरच आर्थिक पाठबळही देत असतात. ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक अमोल पालेकर हेसुद्धा काही वर्षे अध्यक्ष होते. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे नेहमी मार्गदर्शन लाभत आहे. विशेष कार्यक्रमांना ते आवर्जून हजर असतात. ज्येष्ठ चित्रपट समीक्षक अशोक राणे यांनीही काही वर्षे संस्थेची धुरा वाहिली.

नवे वारसदार

नांदगावकर व गांगल यांनी २००० नंतर नवे वारसदार शोधायला सुरुवात केली. २००७ मध्ये प्रा. संतोष पाठारे यांना सचिव करण्यात आले. प्रा. अभिजित देशपांडे, लेखक व ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार, समीक्षक गणेश मतकरी, वैभव बागकर, संदीप मांजेकर, अमित चव्हाण, संध्या सोमन अशी नवी पिढी संस्थेला पुढे नेत आहे. नव्या कल्पना, नवे विचार घेऊन फिल्म सोसायटी चळवळ बळकट करत आहे.

सरकारने पाठीशी उभे राहावे

सांस्कृतिक चळवळीतील माणसे काही वेळा पद सोडत नाहीत. आम्ही मात्र नव्या पिढीच्या हाती सूत्रे दिली. राज्य सरकार चित्रपटांना प्रत्येकी ३० लाख रुपये अनुदान देते. त्यामुळे वर्षभरात आता १०० च्या वर मराठी सिनेमांची निर्मिती होते. मात्र त्यातील केवळ ५० चित्रपट प्रदर्शित होतात. मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही. मराठीतील आशयघन, कलात्मक चित्रपट मुंबई, पुण्याबाहेर फारसे चालत नाहीत. कारण चित्रपटांचे राज्यभर अभ्यासवर्ग होत नाहीत. कलात्मक चित्रपटांबाबत जागरूकता निर्माण झालेली नाही. राज्य सरकार निर्मिती व वितरणाला आर्थिक पाठबळ देते. मात्र चित्रपट प्रदर्शन व प्रेक्षकांची जागरूकता यावर काम होत नाही. त्यासाठी फिल्म सोसायट्यांना सरकारने अनुदान द्यावे. - सुधीर नांदगावकर,

संस्थापक व मार्गदर्शक, प्रभात चित्र मंडळ

Dailyhunt
Top