Wednesday, 14 Mar, 3.02 am महाराष्ट्र

अकोला
हौशी रंगभूमीवर काम करण्यासाठी परिश्रम हवेत! - ज्येष्ठ नाट्यकर्मी राम जाधव

अकोला: हौशी रंगभूमीपेक्षा युवा कलावंत व्यावसायिक रंगभूमीला महत्त्व देतात. हौशी रंगभूमीवर काम करताना अधिक मेहनत घ्यावी लागते आणि ही मेहनत करण्याची युवा कलावंतांची मानसिकता दिसत नाही. कसदार अभिनय करायचा असेल, तर हौशी रंगभूमीकडे युवकांनी वळून दर्जेदार नाटके बसविली पाहिजे. मन आणि शरीराने अभिनय केल्यास तो परिपक्व अभिनय दिसतो, अशा शब्दात अ.भा. मराठी नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नाट्यकर्मी राम जाधव यांनी मार्गदर्शन केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबईच्या नियामक मंडळावर ज्येष्ठ नाट्यकर्मी अशोक ढेरे, अनिल कुळकर्णी यांची बिनविरोध निवड झाल्यानिमित्त मंगळवारी सायंकाळी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राम जाधव बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रकाश जोशी होते. अतिथी म्हणून अ.भा. मराठी नाट्य परिषद मलकापूर (अकोला) शाखेचे अध्यक्ष प्रा. मधू जाधव, नाट्य लेखक बालचंद्र उखळकर, भारत सुरडकर उपस्थित होते. त्यावेळी राम जाधव व प्रकाश जोशी यांच्या हस्ते अ.भा. मराठी नाट्य परिषद, मुंबईच्या नियामक मंडळावर बिनविरोध निवडून आलेले अशोक ढेरे, अनिल कुळकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. अ.भा. मराठी नाट्य परिषद मुंबईच्या नियामक मंडळाच्या निवडणुकीसाठी अकोला व मलकापूर शाखेने ढेरे व कुळकर्णी यांना उमेदवारी दिली होती. त्यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी अ.भा. मराठी नाट्य परिषद अकोला शाखेचे अध्यक्ष माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर, कार्याध्यक्ष राम जाधव, उपाध्यक्ष रमाकांत खेतान, प्रमुख कार्यवाह शुभदा देव, शशिकांत जोशी, मुकुंद जोशी, रश्मी जोशी, प्रा. डॉ. ज्ञानसागर भोकरे, मलकापूर शाखेचे अध्यक्ष प्रा. मधू जाधव, डॉ. गजानन नारे, बालचंद्र उखळकर, अ‍ॅड. विनोद साकरकर आदींनी प्रयत्न केले. त्यावेळी प्रकाश जोशी यांनी दोन्ही पदाधिकाºयांची बिनविरोध झालेली निवड हे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे यश आहे, अशा शब्दात कौतुक केले. प्रा. मधू जाधव यांनी यंदा प्रथमच दोन्ही शाखा एकजूट झाल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. आता या दोन्ही शाखा सोबत काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत जामदार यांनी केले. आभार प्रा. डॉ. ज्ञानसागर भोकरे यांनी मानले. (प्रतिनिधी)


Web Title: Need to work on the amateur stage! - Senior dramatist Ram Jadhav
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.
Dailyhunt
Top