Monday, 20 Jan, 5.56 am महाराष्ट्र

महाराष्ट्र
मुंबईच्या चौपाट्यांवर आता पोलिसांचेही घोडे धावणार, 26 जानेवारीला घोडदळाचे संचलन

  • tags

मुंबईच्या चौपाटय़ांवर पोलिसांची कायम गस्त असते. या गस्त घालणाऱया पोलिसांच्या दिमतीला घोडे असणार आहेत. बॉडी कॅमेरा, वॉकीटॉकीसह सज्ज पोलीस घोडेस्वार चौपाटय़ांवर नजर ठेवणार आहेत. 30 जणांच्या घोडदळाचा पोलीस पथकात समावेश करण्यात आला असून हे घोडदळ प्रजासत्ताकदिनी शिवाजी पार्क येथील संचलनात सलामी देणार आहे.

या घोडदळाविषयी माहिती देण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मुंबई पोलिसांचे 'माऊंटेड पोलीस युनिट' काहतूक नियंत्रण, गर्दीच्या ठिकाणी गस्त, समुद्र चौपटीसारख्या गर्दीच्या ठिकाणी गस्त, नियंत्रणासाठी उपयुक्त ठरेल. सण- महोत्सवाच्या काळात होणारी गर्दी, मोर्चे आदी प्रसंगी पादचाऱयांच्या गर्दीत घुसून परिस्थितीवर लक्ष व नियंत्रण ठेवणे यामुळे शक्य होणार आहे. गर्दीमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी तसेच गुन्हेगारी प्रकृत्तीच्या लोकांकडून होणारी अरेरावी, चोरी आदींवर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी प्रभावी ठरेल. घोडेस्वार उंचावरून गर्दीवर लक्ष ठेवून काही चुकीचे घडत असल्यास तेथे गतीने जाता येईल. पायी चालणाऱया 30 पोलिसांइतकी प्रभावी कामगिरी एक घोडेस्वार पोलीस करू शकेल असे गृहमंत्री यावेळी म्हणाले. यावेळी मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे, सह पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, नवल बजाज, संजय रस्तोगी, अतिरिक्त पोलीस आयुक्त एस. जयकुमार, विरेश प्रभू, परिमंडळ उपायुक्त नियती ठाकर आदी उपस्थित होते.

चेतक, बादल, बिजलीसह 13 घोडे

घोडदळात 1 पोलीस उप निरीक्षक, 1 सहाय्यक पोलीस उप निरीक्षक, 4 पोलीस हवालदार आणि 32 पोलीस शिपाई असे मनुष्यबळ मंजूर करण्यात आले आहे. सध्या या युनिटमध्ये देशी व विदेशी 13 जातिवंत घोडे आहेत. यामध्ये 7 विदेशी घोडे तर वीर, तूफान, शेरा, चेतक, बादल, बिजली या देशी प्रजातींच्या घोडय़ांचा समावेश करण्यात आला आहे. उर्वरित अश्व पुढील सहा महिन्यात खरेदी करण्यात येणार आहेत. मागील चार महिन्यांत नवीन घोडे खरेदी करून पोलीस अंमलदारांना लष्कराचे निवृत्त सुभेदार आर. टी. निर्मल यांच्याकडून प्रशिक्षण देण्यात आले. आवश्यकता पडल्यास पुणे, नागपूर आदी शहरातही 'हॉर्स माऊंटेड युनिट' सुरू करण्याचा विचार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

मुंबई पोलीस मुख्यालयात झळकणार रेजिमेंटल फ्लॅग

मुंबई पोलीस दलाला 1954 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या हस्ते रेजिमेंटल फ्लॅग (कलर) पहिल्यांदाच बहाल करण्यात आला होता. ध्वजाचा वापर मध्यंतरी करण्यात येत नव्हता. आता हा ध्वज यापुढे मुंबई पोलीस दलाच्या मुख्यालयात व विविध सशस्त्र मुख्यालयांमध्ये झळवविण्यात येणार आहे. ध्वजाची प्रतिकृती आयुक्त कार्यालयात दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यासाठी देशमुख यांच्या हस्ते मुंबई पोलीस दलाकडे पोलीस ध्वज सुपूर्द करण्यात आला.

मरोळमध्ये अडीच एकरावर तबेला

मुंबई माउंटेड पोलीस युनिटकरीता सशस्त्र पोलीस मरोळ मुख्यालय येथे 30 अश्वांकरिता कायमस्वरूपी तबेला बांधण्यासाठी अडीच एकर जागा निवड केली आहे. या ठिकाणी रायडिंग स्कुल, अश्वांकरीता स्विमिंग पूल, सॅन्ड बाथ, रायडर रुम, ट्रेनर रुम, फिड स्टॉक रुम बांधण्यात येणार आहेत. हे बांधकाम महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. माउंटेड पोलीस दलातील अश्वांना ने-आण करण्याकरिता हॉर्स पोस्ट, हॉर्स ऍम्ब्युलन्स खरेदी करण्यात येणार आहेत. माउंटेड पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी, अंमलदारांना व अश्वांना शो जंपिंग, टेन्ट पिगिंग, पोलो, रेसींग माउंटेड पोलीस कर्तव्य मेळावा अशा विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याकरिता उच्च प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

88 वर्षांनी पुन्हा घोडदळ

यापूर्वी पोलीस दलात माउंटेड पोलीस घोडेस्वारांद्वारे मुंबईच्या रस्त्यावर गस्त घातली जात होती. वाढत्या वाहनांमुळे डिसेंबर 1932मध्ये 'माउंटेड पोलीस युनिट' बंद करण्यात आले. मात्र या घोडेस्वार पथकाची उपयुक्तता लक्षात घेऊन स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अश्वदळाचा मुंबई पोलीस दलात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra
Top