Thursday, 10 Aug, 9.57 am महाराष्ट्र

महाराष्ट्र
सबने देखा आँखों से! मराठा आया लाखों से!!

सामना प्रतिनिधी, मुंबई

डोक्यावर भगव्या टोप्या, हातात शिवाजी महाराजांची रेखाचित्रे असलेले झेंडे, काळे टी शर्ट, त्यावर मराठा मोर्चाचा लोगो आणि उत्साही चेहऱ्यांच्या मराठा क्रांती मोर्चाने मुंबई फुलून गेली होती. मोर्चात राज्यभरातून सहभागी झालेल्या मुले, महिला आणि तरुणांच्या गटांनी आपल्या मागण्या कधी फलकावर तर कधी अंगभर रंगवून अनोख्या पद्धतीने मांडल्या. त्याची झलक पाहायला मिळाली. शिस्तबद्ध मोर्चाने मुंबईकरांची मने जिंकली.

मिशीवाला पाव्हणा
खास कोल्हापूरवरून आलेला हा 'मिशीवाला पाव्हणा' मोर्चेकऱ्यांचे फेटे बांधत होता आणि त्याच वेळी मोठ्या उत्साहाने 'जय भवानी, जय शिवाजी'चा जयघोषही करत होता.

मागण्यांचेच वस्त्र घातले
मुंबईबाहेरून आलेल्या आईसाहेब युवा संघटनेच्या या कार्यकर्त्यांनी भगव्या आणि सफेद रंगाने आपले शरीर रंगवून त्यावर मागण्या लिहिल्या होत्या. त्यांचे हे अनोखे वस्त्र सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.

'माणुसकीच्या गर्दी'तून ऍम्ब्युलन्सलाही मिळाली वाट
जे. जे. उड्डाणपुलावरून एक अॅम्ब्युलन्स सीएसटीच्या दिशेने जात असताना मराठा मोर्चाने पाठीमागून येणाऱ्या ऍम्ब्युलन्सला अगदी अलगद वाट करून दिली आणि मोर्चातील माणुसकीचे दर्शन घडले. मोर्चाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत रस्त्याची एक मार्गिका मोकळी ठेवण्यात आली होती. याचा फायदा अशा शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण मोर्चात दिसून आला.

झेंडा माझा झोकात!
मोर्चात पालकांसह मुलेही सहभागी झाली होती. मोर्चाचा उत्साह आईबरोबर या मुलीमध्येही उतरला होता. डोक्यावर भगवी टोपी आणि हातातला झेंडा तिचा उत्साह वाढवत होता. झेंडा उंच धरून तो फडकत राहावा, यासाठी ती हट्ट करत होती तर ती पडू नये, यासाठी आई तिची काळजी घेत होती. मोर्चात आई-मुलीच्या अशा अनेक जोड्या लक्ष वेधून घेत होत्या.

मोर्चासाठी सांगलीहून आलेला श्रीमंत हंसनाळे हा चिमुकलाही उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता.

महाराष्ट्रातील नेत्यांनी आम्हालाही न्याय द्यावा

बेळगावातील मराठा समाजाने मोर्चात सहभागी होऊन मागण्यांना पाठिंबा दिला. मराठा असताना बेळगावात आमच्यावर कानडी भाषेत शिक्षण घेण्याची सक्ती केली जाते. या अन्यायाची दखल महाराष्ट्रातील नेत्यांनी घेऊन आम्हाला न्याय द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

बारामती ते मुंबई सायकलवारी

मोर्चा ज्या ठिकाणी तेथे मी सायकलनेच जातो. बारामतीहून मुंबईतही सायकलनेच आलो. सहा ऑगस्टला निघालो आणि आज पोहचलो. मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ही सायकलवारी अशीच सुरू राहील.
- राजेंद्र पाटील, बारामती

संयमाचा अंत पाहू नका!
मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकार वारंवार चालढकल करीत आहे. वर्षभरापासून शांततेत मोर्चे काढले जात आहेत ही आमची कमजोरी समजू नका. त्यामुळे सरकारने आमचा अंत बघू नये. - सुनील बोरकर, डोंबिवली

टक्केवारी असूनही अॅडमिशन नाही
जास्त टक्के असूनही केवळ आरक्षण नाही म्हणून अॅडमिशन मिळत नाही. इतरांना कमी टक्के असून आरक्षण असल्यामुळे चांगल्या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळते. हा अन्याय आहे. - अरविंद रावराणे, मुंबई

पुढची पिढी बरबाद करू नका!


मी अपंग आहे. तरीदेखील मला नोकरी मिळाली नाही. आरक्षणामुळे संधी हुकली. आरक्षण नसल्यामुळे आमची पिढी बरबाद झाली. मात्र पुढची पिढी बरबाद होऊ देणार नाही. - गोविंद जगदाळे, सातारा

.तर सत्तेवरून खाली खेचू
मराठा समाजावरील अन्यायाविरोधात जिल्हानिहाय मोर्चा काढूनही सरकारला जाग न आल्यानेच मुंबईवर धडक दिली. ठोस निर्णय न झाल्यास सरकारला सत्तेवरून खाली खेचू. - बाबासाहेब मोरे, संगमनेर

यापुढे अन्याय सहन करणार नाही!
आरक्षण नसल्यामुळे पात्रता असूनही शिक्षण आणि नोकरी अशा दोन्ही ठिकाणी अन्याय झाला. त्यामुळे मराठा समाज पिछाडीवर आहे. आमचे हक्क आम्ही मिळवणारच. - आत्माराम नाईक, सिंधुदुर्ग

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra
Top