Thursday, 28 Jun, 12.56 pm महाराष्ट्र

महाराष्ट्र
सांगलीच्या हळदीला भौगोलिक मानांकन

सांगली : जागतिक बाजारात हळदीचे दर निश्चित करणाऱ्या सांगलीच्या हळदीला भौगोलिक मानांकन मिळाले आहे. सांगलीच्या हळदीमध्ये असलेले विविध औषधी गुणधर्म, हळदीची इथे असलेली वैशिष्टय़पूर्ण बाजारपेठ, साठवणुकीसाठी नैसर्गिक पेवाचा वापर, रंग, गुणधर्म यामुळे हे भौगोलिक मानांकन मिळाले आहे.

सांगलीच्या हळदीला भौगोलिक मानांकन (जिऑग्राफिकल इंडेक्स : जीआय) मिळावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी प्रथम २०१३ मध्ये मुंबईच्या इंडियन पेटंट कार्यालयाकडे केली होती. त्याचवेळी वर्धा जिल्ह्यतील वायगाव येथील शेतकऱ्यांनी वायगावी हळदीला जीआय मानांकन मिळविण्यासाठीही प्रस्ताव सादर केला होता.

वायगाव हे गाव ८० टक्के हळदीचे उत्पादन घेत आहे. त्या हळदीत करक्युमिनचे (औषधी गुणधर्म असलेला घटक) प्रमाण ६ ते ८ टक्के आहे. याच हळदीने इतर वाणांच्या हळदीला मागे टाकून जीआय मानांकन मिळविले होते. त्यामुळे सांगलीच्या हळदीचे जीआय मानांकन हुकले होते. नंतर सांगलीच्या हळदीचा फेरप्रस्ताव सादर झाला. भारतातील ८० टक्के हळदीचा व्यापार सांगलीमधून होतो. देशातील दरही येथील बाजार समितीतील दरावरच अवलंबून असतो. केशरी रंग, पेवातील साठवणूक ही येथील हळदीची खास वैशिष्ट्ये असल्यामुळे, 'सांगलीची हळद' म्हणूनच भौगोलिक मानांकन (जिऑग्राफिकल इंडेक्स - जीआय) मिळावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी मुंबईच्या 'इंडियन पेटंट' कार्यालयाकडे पुन्हा केली होती.

शेतकऱ्यांतर्फे 'जीआय' विषयातील अभ्यासक प्रा. गणेश हिंगमिरे यांनी भौगोलिक उपदर्शन नोंदणी विभागाचे सहायक रजिस्ट्रार चिन्नाराजा जी. नायडू यांच्यासमोर सांगलीच्या हळदीच्या वैशिष्ट्यांची मांडणी केली. या सर्वाची बाजू समजून घेतल्यानंतर नायडू यांनी सांगलीच्या हळदीला जीआय मानांकन जाहीर केले.

हळदीला मानांकन मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सांगलीची हळद म्हणून मान्यता मिळाली आहे. ही मान्यता केंद्र सरकारकडून मिळाल्यामुळे हा सांगलीचा ब्रँड म्हणून कायमस्वरूपी बाजारात विकला जाणार आहे. आजवर जगातील १६० देशांनी 'जीआय' मानांकनास मान्यता दिली आहे. हे मानांकन मिळाल्यानंतर त्या त्या परिसरातील पिकांच्या गुणवैशिष्ट्यांवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जाते.

Dailyhunt
Top