Monday, 10 Feb, 7.56 pm महाराष्ट्र

महाराष्ट्र
शिर्डी विमानतळावर असुविधा, प्रवाशांची परवड; अनेक विमानांचे लँडींग रद्द

  • tags

देशातील व परदेशातील साईभक्तांच्या सोयीसाठी शिर्डी येथे राज्य सरकारच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने उभारलेल्या शिर्डी येथील साईबाबा इंटरनॅशनल एअरपोर्टवर विमानांच्या लँडीग आणि टेकअपसाठी चांगल्या दर्जाची यंत्रणा अद्याप बसवण्यात आली नसल्याने दृश्यमानतेच्या (व्हिजिबिलिटी) अडचणींचा सामना विमानांना करावा लागत आहे. धुके अथवा खराब हवामानामुळे विमान कंपन्यांना अचानक विमानांचे लँडीग रद्द करून विमान दुसरीकडे वळवावे लागत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे विमान कंपन्या आणि प्रवाशांनी विमानतळ प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. सोमवारीही कमी दृश्यमानतेमुळे विमानांचे लँडीग होऊ शकले नाही.

राष्टपतींच्या हस्ते घाईघाईत 2018 मध्ये शिर्डी विमानतळाचा लोकार्पण सोहळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासुन शिर्डी विमानसेवेला सुरुवात करण्यात आली. उद्घाटन सोहळ्यात दोन महिन्यात नाईट लँडीगसह सर्व सुविधा देण्याची ग्वाही महाराष्ट्र विमानतळ कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली होती. त्यानंतर दोन वर्ष उलटूनही अद्याप नाईट लँडीग सुविधा देण्यात आलेली नाही. प्रवाशांसाठी असलेली टर्मिनल इमारतही अद्ययावत नाही. याबाबत शिर्डी विमानतळाचे डायरेक्टर दिपक शास्त्री यांनी उडवाउडवीची उत्तरे देत वेळकाढ़ू भूमिका घेतल्याची तक्रार विमान कंपन्या आणि विमान प्रवाशांकडून होत आहे. याकामात निधीची कोणतीही अड़चण नसल्याचे शास्त्री यांनी सांगितले. हे काम नेमके कोठे अडले आहे, असा प्रश्न विमान प्रवाशांना पडला आहे.

दोन महिन्यांपूर्वी कमी दृश्यमानतेमुळे शिर्डी विमानतळावरील लँडीग जवळपास महीनाभर बंद होते . त्यावेळी नाताळ व दिवाळीच्या सुट्टीत शिर्डीत येणाऱ्या विमान प्रवाशांची गैरसोय झाली होती. महिनाभरानंतर कोट्यवधींचा खर्च करून हा प्रश्न सोडवण्यात आल्याचे सांगत पुन्हा विमानसेवा सुरू करण्यात आली. मात्र, सोमवारी पुन्हा हाच प्रश्न निर्माण झाल्याने मोठ्या बोईंग विमानांचे लँडीग शिर्डीत झाले नाही. त्यामुळे दिल्ली आणि चेन्नईच्या विमानप्रवाशांचे हाल झाले. दिल्ली विमान अचानक रद्द केल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. विमानतळ विकास कंपनीच्या मनमानी कारभारामुळे देश विदेशातील विमान प्रवाशांना त्रआस होत आहे. सरकारने तातडीने नाईट लँडीगसह इतर आवश्यक सुविधा शिर्डी विमानतळावर उपलब्ध करून देण्यात मागणी विमान प्रवाशांकडून होत आहे. शिर्डी एअरपोर्टला देशभरातील विमान प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सध्या दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद,चेन्नई, इंदूर आदी ठिकाणांहून शिर्डीत दररोज 28 विमान फेऱ्या होतात. मुंबई, पुणे, नागपूरनंतर शिर्डी एअरपोर्ट चौथ्या स्थानावर असताना शिर्डी एअरपोर्टकडे सरकारने दुर्लक्ष करू नये अशी मागणी विमानप्रवाशांकडून होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra
Top