Saturday, 15 Apr, 7.11 am महाराष्ट्र

बीड
वॉटर कपसाठी जायभायवाडी एकवटली

 • अनिल महाजन धारूर

  अभिनेता आमिर खान यांच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातील ४४ गावे सहभागी झाली आहेत. कुठल्याही परिस्थितीत विजेतेपदावर नाव कोरायचेच यासाठी जायभायवाडी येथील ग्रामस्थ जोमाने कामाला लागले आहेत.

  दोन हजार लोकसंख्येच्या या गावाच्या पश्चिमेला डोंगरमाथ्यावर व गायरानमध्ये बांधबंदिस्तीची कामे सुरू आहेत. एक कुटुंब व पाच मीटर खोदकाम असे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे दररोज सकाळी व सायंकाळी आबालवृध्द डोंगरमाथ्यावर बांधबंदिस्तीच्या कामात एकजुटीने उतरत आहेत. सकाळची न्याहरी कामाच्या ठिकाणीच केली जात असून, घरोघर जाऊन भाकरी, भाजी गोळा करण्याचे व राबणाऱ्या लोकांना पाणी देण्याची जबाबदारीही वाटून दिली आहे.

  ६५ उंबरे असलेल्या या गावातील प्रत्येक कुटुंब जलसंधारण कामासाठी राबत आहे. मुदती काम पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. रोजच्या रोज कामांचा आढावा देखील घेतला जात आहे.

  स्वच्छतेसाठीही पुढाकार

  जायभायवाडी या गावाने जलसंधारणासोबतच स्वच्छतेलाही प्राधान्य दिले आहे. दररोज सकाळी जलसंधारण कामावर जाण्यापूर्वी गावकरी गावात साफसफाईची कामे करतात. शौचालयाची बांधकामेही सुरू असून, रस्त्यावर केरकचरा होणार नाही याची प्रत्येकजण काळजी घेत असतो.

 • Top