Dailyhunt
अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी 'महा-साधना सप्ताह'; ८ एप्रिलपर्यंत व्यापक प्रशिक्षण मोहीम

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी 'महा-साधना सप्ताह'; ८ एप्रिलपर्यंत व्यापक प्रशिक्षण मोहीम

त्रपती संभाजीनगर, दि. ४ (विमाका ) : शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी केंद्र शासनाच्या 'मिशन कर्मयोगी' अंतर्गत २ ते ८ एप्रिल २०२६ या कालावधीत 'महा-साधना सप्ताह' राबविण्यात येत असून, या उपक्रमात विभागातील सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

भारत सरकारचा क्षमता विकास आयोग (CBC) आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या विशेष प्रशिक्षण उपक्रमात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 'iGOT कर्मयोगी भारत' पोर्टलवर लॉग इन करून किमान ४ तासांचे अभ्यासक्रम पूर्ण करावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे शासकीय यंत्रणेला अधिक कार्यक्षम, तंत्रज्ञानस्नेही आणि परिणामकारक बनविणे हा आहे. डिजिटल गव्हर्नन्स, वेळ व्यवस्थापन, निर्णयक्षमता वाढविणे, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित साधनांचा प्रभावी वापर या बाबींवर विशेष भर देण्यात येणार आहे.

"सतत नवीन शिकणे आणि स्वत:ला अद्ययावत ठेवणे ही काळाची गरज आहे. महासाधना सप्ताह हा अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या गुणवत्तावृद्धीसाठी मोठी संधी आहे. सर्वांनी नियोजनबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवून यशस्वी करावा," असे पापळकर यांनी नमूद केले.

या सप्ताहात सहभागी होत असताना अधिकारी व कर्मचारी आपले नियमित कामकाज सांभाळूनच ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करणार असल्याने कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही, तर उलट कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी केला.

यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे तीन अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना 'एआय दक्ष' बॅज, तर मार्केटप्लेसवरील विस्तारित अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना 'कर्मयोगी उत्कर्ष' बॅज देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांना 'TECH-वारी 2.0' मध्ये सन्मानित करण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्हे, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर शासकीय कार्यालयांनी या उपक्रमात १०० टक्के सहभाग सुनिश्चित करून विभागाची कामगिरी अधिक भक्कम करावी, असेही आवाहन श्री. पापळकर यांनी केले आहे.

००००

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr shasan