Dailyhunt
दत्ताभाऊंच्या केंद्रस्थानी कायम सर्वसामान्य माणूस असायचा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दत्ताभाऊंच्या केंद्रस्थानी कायम सर्वसामान्य माणूस असायचा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. ४ : स्व. दत्ता मेघे हे जनसामान्यांचे, बहुजनांचे, गोरगरिबांचे नेते होते. लोक त्यांना प्रेमाने दत्ताभाऊ म्हणायचे. पण ते खऱ्या अर्थाने 'दाता'भाऊ होते, लोकनेते होते. समाजातील वंचितांसाठी त्यांनी व्यवस्था उभी केली.

सर्वसामान्य माणूस त्यांच्या कायम केंद्रस्थानी असायचा. त्यांच्या मदतीसाठी कायम ते तत्पर असायचे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

व्हीसीए जामठा येथे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री स्व. दत्ता मेघे यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. कामगार मंत्री आकाश फुंडकर, गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, महापौर नीता ठाकरे, खासदार माया इवनाते, खासदार अमर काळे, आमदार संजय कुटे, आमदार नाना पटोले, आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, माजी मंत्री रणजीत देशमुख, माजी मंत्री रमेश बंग, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी खासदार विलास मुत्तेमवार, माजी मंत्री राजेंद्र मुळक, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, माजी खासदार अजय संचेती, माजी आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांचीही उपस्थिती होती. स्व. दत्ता मेघे यांचे सुपूत्र आमदार समीर मेघे, सागर मेघे यांच्यासह मेघे कुटुंबिय, विविध क्षेत्रातील मान्यवर आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, दत्ताभाऊंनी आपल्याला जी गोष्ट मिळाली नाही ती इतरांना कशी मिळेल, यासाठी विविध क्षेत्रात काम उभे करीत मदत केली. हा विस्तार करतानाही त्यांच्या डोळ्यासमोरून सर्वसामान्य माणूस गेला नाही. संस्था उभ्या करतानाही त्यांनी गुणवत्तेशी कधी तडजोड केली नाही. आरोग्य, शिक्षण, सहकार अशा प्रत्येक क्षेत्रात आपला विस्तार गुणवत्तापूर्वक होईल, असा विचार केला. अशा प्रकारचे नेते फार कमी पहायला मिळतात, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

कर्तृत्व दर्शविणारी दोन स्मारके नागपूर आणि वर्धा येथे लवकरच

स्व. दत्ता मेघे यांची कर्तृत्व दर्शविणारी दोन स्मारके नागपूर आणि वर्धा येथे लवकरच निर्माण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सर्वसामान्य, गोरगरिबांची सेवा करण्याचा दत्ताभाऊंचा वारसा पुढे नेण्याचे कार्य या माध्यमातून होईल व स्मारकाच्या निमित्ताने पुढच्या पिढ्यांना त्यांचे स्मरण होईल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही आपल्या भाषणात या स्मारकांचे सूतोवाच केले.

राजकारणात असतानाही पूर्णवेळ समाजकारण - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

लोकनेते दत्ता मेघे यांनी राजकारणात असतानाही पूर्णवेळ समाजकारण केले. अशी माणसे दुर्मिळ असतात आणि दत्ताभाऊ राजकारणातील दुर्मिळ व्यक्तिमत्व होते, या शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी स्व. दत्ता मेघे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी पुढे म्हणाले की, आपल्या आयुष्याच्या सुरुवातीला दत्ताभाऊंनी जे दुःख सोसले, त्याचा त्यांना कधीही विसर पडला नाही. अखेरच्या श्वासापर्यंत समाजातील गोरगरिबांबद्दल त्यांच्यातील संवेदनशीलता जागृत होती. अडचणीत असलेली व्यक्ती त्यांच्याकडे आली तर ती कधीही रिकाम्या हाताने परत जात नसे. प्रत्येकाच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले, असे केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यावेळी म्हणाले.

००००

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr shasan