Dailyhunt
घाटकोपर-मानखुर्द लिंक रस्त्यालगत ११ एकर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त

घाटकोपर-मानखुर्द लिंक रस्त्यालगत ११ एकर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त

मुंबई, दि. ८ : घाटकोपर-मानखुर्द लिंक रस्त्यालगत असलेल्या सुमारे ११ एकर शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची मोठी व नियोजनबद्ध कारवाई मुंबई उपनगर प्रशासनामार्फत यशस्वीपणे पार पाडण्यात आली.

या विशेष मोहिमेदरम्यान एका दिवसात १२०० हून अधिक झोपड्यांचे निष्कासन करण्यात आले असून संबंधित जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली असल्याचे माहिती मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. निष्कासन कार्यवाहीमध्ये समीर शेख, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-६) यांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त उपलब्ध करुन देऊन शांततेत कार्यवाही करणेसाठी महत्वपूर्ण योगदान दिले. मौजे मानखुर्द, ता. कुर्ला, न.भू.क्र.१/२ (पै) या शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. या अतिक्रमणाविरोधात निष्कासनाची कार्यवाही करणेबाबत संबंधित सर्व यंत्रणांना निर्देश देण्यात आले होते.

या कारवाईत पद्माकर रोकडे, अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का) पूर्व उपनगरे , आशा तामखेडे, उपजिल्हाधिकारी (अति/निष्का), कल्पना गोडे, उपविभागीय अधिकारी, पूर्व उपनगर, उज्वल इंगोले, सहाय्यक आयुक्त (एम/पूर्व), बृहन्मुंबई महानगरपालिका, विना मते, सहा. अभियंता, अक्षय गायकवाड, सहा. अभियंता बृहन्मुंबई महानगरपालिका, दिलीप रायण्णावर, तहसीलदार कुर्ला, कबीर शेख, सहा. पोलीस आयुक्त, मधु घोरपडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानखुर्द पोलीस स्टेशन, श्री. जाधव, सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांचे ४०० लोकांचे पथक तयार करणेत आले होते.

या मोहिमेद्वारे आतापर्यंत १२०० हून अधिक झोपड्यांचे निष्कासन करण्यात आले असून ११ एकर शासकीय जमीन मोकळी करण्यात आली आहे. उर्वरित अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

अतिक्रमणावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने २०११ पासून सॅटेलाईट छायाचित्रांच्या सहाय्याने अतिक्रमण शोधण्याची प्रणाली विकसित केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भविष्यातही अशा प्रकारच्या अतिक्रमणांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल. शासकीय जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिला आहे.

०००

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr shasan