Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जैन विद्यार्थ्यांसाठी राज्यात सात ठिकाणी वसतिगृह उभारणार

जैन विद्यार्थ्यांसाठी राज्यात सात ठिकाणी वसतिगृह उभारणार

मुंबई, दि.२ : जैन समाजातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मुंबई, नवी मुंबई, पुणेसह राज्यातील एकूण सात ठिकाणी वसतिगृहे उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाच्या संचालक मंडळाच्या चौथ्या बैठकीत घेण्यात आला.

ही बैठक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात पार पडली.

बैठकीत महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्ज व व्याज परतावा योजनांच्या सुधारित प्रारूपास मान्यता देण्यात आली. तसेच ‘विहारधाम निर्माण योजना’ आणि ‘पाठशाळा आधुनिकीकरण व सक्षमीकरण योजना’ राबविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास व वित्त महामंडळ कडून निधी उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या वसतिगृह उभारणीसंदर्भात प्राप्त मागण्यांचा विचार करून राज्यातील सात ठिकाणी विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी वसतिगृहे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

याशिवाय, ‘मराठी जैन साहित्य विश्वकोष’ निर्मितीसाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. कौशल्य विकास विभागाच्या सहकार्याने जैन युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम तसेच इतर रोजगाराभिमुख योजनांचा लाभ मिळावा यासाठी विशेष अभियान राविले जाणार असून महिला व बाल विकास विभागाच्या सहकार्याने महिला बचत गटांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्याबाबतही चर्चा झाली.

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार महामंडळाच्या विविध योजनांमध्ये जैन समाजाचा अधिकाधिक सहभाग वाढावा, तसेच योजनांची माहिती समाजातील प्रमुख व्यक्तींपर्यंत पोहोचावी यासाठी नवी दिल्ली येथे विशेष बैठक आयोजित करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी पाठपुरावा करून जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी नवी दिल्ली येथे झालेल्या सामंजस्य करारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याबद्दल समन्वयक संदीप भंडारी यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. उपस्थित सर्व सदस्यांनी हा ठराव एकमताने मंजूर करून अध्यक्षांच्या कार्याचे कौतुक केले.

बैठकीस अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिव माधवी खोडे-चवरे,अल्पसंख्याक विकास विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक मेघना शिंदे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यक्रम व्यवस्थापक गौरी दोंदे, वित्त विभागाच्या कार्यासन अधिकारी रचना तळेकर, कौशल्य विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद माळी, समन्वयक संदीप भंडारी, महामंडळाचे सदस्य रावसाहेब पाटील, सुनील पाटणी तसेच विकास अच्छा, अमित जैन, दर्शना जैन, विश्वजीत कोल्हापुरे आणि प्रशांत गौडाजे उपस्थित होते.

0000

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr shasan