Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'कोयना बॅक वॉटर फेस्टिव्हल २०२६' महाराष्ट्राच्या पर्यटनाला नवी उंची देणारा ठरेल  - मंत्री शंभूराज देसाई

'कोयना बॅक वॉटर फेस्टिव्हल २०२६' महाराष्ट्राच्या पर्यटनाला नवी उंची देणारा ठरेल - मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. ३० : 'कोयना बॅक वॉटर फेस्टिव्हल २०२६' अधिक भव्य, आकर्षक आणि जागतिक दर्जाचा करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. नैसर्गिक सौंदर्य, साहसी पर्यटन आणि स्थानिक संस्कृतीचा संगम घडवून महाराष्ट्राच्या पर्यटनाला नवी ओळख देणारा हा महोत्सव ठरेल, असा विश्वास पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

मेघदूत या शासकीय निवासस्थानी 'कोयना बॅक वॉटर फेस्टिव्हल २०२६' संदर्भात आयोजित आढावा बैठकीत पर्यटन मंत्री देसाई बोलत होते. बैठकीस पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, पर्यटन संचालनालयाचे माजी संचालक मंगेश जोशी, नवनियुक्त संचालक विकास पानसरे, उपसचिव संतोष रोकडे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र सोनवणे, सहसंचालक संतोष जाधव, सहाय्यक संचालक रविंद्र पवार तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे सातारा जिल्हाधिकारी, सातारा उपवनसंरक्षक, वाई-महाबळेश्वर उपविभागीय अधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत मागील वर्षीच्या फेस्टिव्हलच्या अनुभवाचा सविस्तर आढावा घेऊन यंदाचा महोत्सव अधिक संस्मरणीय करण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. तंबू निवास, जलक्रीडा, लेझर शो, ड्रोन शो, हाऊसबोटिंग, सांस्कृतिक कार्यक्रम आणि खाद्य महोत्सव अधिक प्रभावीपणे आयोजित करण्याबरोबरच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या प्रभावी ब्रँडिंगसाठी विविध ठिकाणी डिजिटल स्क्रीन उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या.

याशिवाय कोयना बॅक वॉटर फेस्टिव्हलला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने कार्निव्हल फेस्टिव्हल, फ्लोटिंग मार्केट, घोडेस्वारी, हेलिकॉप्टर राईड, पतंग महोत्सव, ऐतिहासिक वारसा स्थळांची विशेष पर्यटन सहल (हेरिटेज टूर) तसेच योगा उपक्रमांचा महोत्सवात समावेश करण्याचे निर्देश देण्यात आले. ख्रिसमस ते नववर्ष या कालावधीत मोठ्या उत्साहात आणि प्रभावी नियोजनासह हा पर्यटन महोत्सव आयोजित करून देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

अंतिम स्थळ निश्चित करण्यासाठी आवश्यक जागेची पाहणी, वाहतूक व्यवस्थापन, पोलीस बंदोबस्त आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने नियोजन करून महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना पर्यटन मंत्री देसाई यांनी दिल्या.

0000

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr shasan