Saturday, 14 Dec, 6.20 pm माझा पेपर

होम
आरेतील एक झाड तोडण्यासाठी तब्बल साडेतेरा हजार खर्च

मुंबई : तब्बल दोन हजार 11 झाडांची कत्तल आरेतील मेट्रो कारशेडसाठी 4 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर या तीन दिवसांमध्ये करण्यात आली. तब्बल 2 कोटी 70 लाख 16 हजार 898 रुपये यासाठी खर्च आला आहे. म्हणजे प्रत्येक झाड तोडण्याचा खर्च हा 13 हजार 434 रुपये एवढा आहे. यासंदर्भातील माहितीची एमएमआरसीएलकडे माहिती अधिकारात माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद भंडारे यांनी विचारणा केली होती. त्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मेट्रो कारशेडसाठी आरेमध्ये 4 ऑक्टोबरच्या रात्री दोन हजारांहून अधिक झाडांची कत्तल करण्यात आली होती. रात्रीतून झालेल्या झाडांच्या कत्तलीवर जनसामान्यांतून मोठी टीकाही झाली. पर्यावरणप्रेमींनी यावर उत्स्फुर्तपणे मोठे आंदोलनही केले. पण, आता माहिती अधिकारातून या वृक्षतोडीबाबत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एमएमआरसीएलने दिलेल्या माहितीनुसार तब्बल दोन हजार 11 झाडांची 4 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर या तीन दिवसांमध्ये कत्तल करण्यात आली. यासाठी तब्बल 2 कोटी 70 लाख 16 हजार 898 रुपये खर्च आला आहे.

तज्ञांच्या माहितीनुसार तीन वर्षांसाठी एक हजार रुपये खर्च नविन लावलेले एक झाड जगवताना येतो. त्यामुळे एमएमआरसीएलने झाडांची कत्तल तर केलीच. त्याचबरोबर त्यावर वारेमाप पैसाही खर्च केला, असा मुद्दा या निमित्ताने उपस्थित झाला आहे. एका महिन्याच्या आत माहिती अधिकारात उत्तर मिळणे अपेक्षित असताना ही माहिती दोन महिन्यांनंतर प्राप्त झाल्यामुळे, एमएमआरसीएलच्या पारदर्शकतेच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

15 ऑक्टोबरला एमएमआरसीला हा अर्ज प्राप्त झाला. पण याचे उत्तर 9 डिसेंबरला मिळाले. किती झाडे तोडली याचे उत्तर देण्यासाठी डिसेंबर उजाडला, असे भंडारे यांनी म्हटले आहे. पोस्टाने न येता हे पत्र हाती देण्यात आले आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत माहिती अधिकाराचे उत्तर न मिळाल्याने त्यांनी अपील केल्यानंतर ही प्रक्रिया पुढे नेली असावी, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. पण 11 नोव्हेंबरची या पत्रावर तारीख दिसत आहे. डिसेंबरमध्ये हातात मिळालेल्या पत्रावर नोव्हेंबरची तारीख कशी काय असू शकते आणि पत्रावर जर 11 नोव्हेंबरची तारीख असेल तर हे उत्तर द्यायला उशीर कोणत्या कारणामुळे झाला, हे स्पष्ट होणे अपेक्षित असल्याचे मत भंडारे यांनी नोंदवले. या संदर्भातील वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Paper
Top