Wednesday, 05 Aug, 10.07 am माझा पेपर

होम
भूमिपुजनाच्या पार्श्वभूमीवर महेश लांडगे पिंपरी-चिंचवडमध्ये वाटणार १० लाख लाडू!

पुणे - अयोध्येत आज राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. अवघी अयोध्यानगरी या ऐतिहासिक क्षणासाठी सजली आहे. देशभरातील नागरिकांनी सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आहे तिथूनच हा सोहळा साजरा करण्याचे आवाहनही भाजपकडून करण्यात आले आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी या पार्श्वभूमीवर लाडू वाटपाचा कार्यक्रम घोषित केला आहे. पण यावर पोलिसांनी आक्षेप घेतला असून त्यांनी आमदार लांडगे यांना नोटीस पाठवली आहे.

मंगळवारी (४ ऑगस्ट) रोजी सीआरपीसी १४९ अंतर्गत पोलिसांनी आमदार लांडगे यांना ही नोटीस पाठवली असून यामध्ये म्हटले की, राम मंदिर भूमिपूजनाच्या अनुषंगाने उद्या (५ ऑगस्ट) ठिकठिकाणी लाडू वाटून आनंद साजरा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लाडू वाटप करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे आपण हा लाडू वाटपाचा कार्यक्रम करु नये. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपल्यावर राहील.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या पुणे शहर आणि जिल्ह्यात गर्दी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. गर्दी झाल्यास ती कोरोनाच्या फैलावासाठी कारणीभूत ठरु शकते. त्यामुळेच पोलिसांनी लांडगे यांना लाडू वाटपाचा जाहीर कार्यक्रम न घेण्याबाबत नोटीस पाठवली आहे. पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने आता लांडगे याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Paper
Top