Saturday, 14 Dec, 5.20 pm माझा पेपर

होम
डेव्हिड वॉर्नरने मोडला ब्रॅडमनचा विक्रम

पर्थ - ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात पर्थच्या मैदानावर खेळल्या जाणार्‍या डे-नाईट कसोटी सामन्यामध्ये सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने सर डॉन ब्रॅडमनला मागे टाकले आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये धावा काढण्यात ब्रॅडमन यांना मागे टाकले आहे. पर्थ कसोटीच्या तिसर्‍या दिवशी ऑस्ट्रेलियन सलामीवीरने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधील आपल्या सात हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

असे करणारा वॉर्नर हा ऑस्ट्रेलियाचा 12 वा फलंदाज आहे. 52 कसोटी सामन्यांमध्ये ब्रॅडमन यांनी 6996 धावा केल्या होत्या. वॉर्नरने त्यांना आता मागे टाकले आहे. वेगवान सात हजार कसोटी धावा करणारा डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियाचा पहिला सलामीवीर ठरला. 81 कसोटी सामन्यांच्या 151 डावात वॉर्नरने हा पराक्रम केला. स्टीव्ह स्मिथच्या नावावर सर्वात वेगवान सात हजार कसोटी धावा करण्याचा विक्रम आहे.

स्मिथने हे स्थान अवघ्या 126 डावात मिळवले. मॅथ्यू हेडनने 142, रिकी पॉन्टिंग 145 आणि मायकेल क्लार्कने 149 डावांमध्ये आपल्या सात हजार कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या. कसोटी क्रिकेटमध्ये सात हजार धावा करणारा वॉर्नर ऑस्ट्रेलियाचा 12 वा फलंदाज ठरला. त्याआधी अ‍ॅलन बॉर्डर, मार्क टेलर, डेव्हिड बून, ग्रेग चॅपल, स्टीव्ह वॉ, मार्क वॉ, मॅथ्यू हेडन, जस्टिन लॅंगर, रिकी पॉन्टिंग, मायकेल क्लार्क आणि स्टीव्ह स्मिथ यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ही कामगिरी केली आहे.

वॉर्नरने अलीकडेच पाकिस्तानविरुद्ध 335 धावांची शानदार खेळी खेळली. एका वर्षाच्या बंदीनंतर परत आलेल्या वॉर्नरला मैदानात परत येणे अत्यंत कठीण होते. अॅशेस मालिकेमध्ये तो पूर्णपणे अपयशी ठरला होता, परंतु पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने शानदार पुनरागमन केले आणि खोऱ्याने धावा जमावल्या.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Paper
Top