Monday, 14 Jun, 5.12 pm माझा पेपर

होम
दिएगो मॅराडोना यांच्या मृत्यूप्रकरणी अर्जेटिनाच्या वकिलांकडून या सात जणांची चौकशी

अर्जेंटिना - गेल्यावर्षी वयाच्या ६०व्या वर्षी महान फुटबॉलपटू तसेच अर्जेटिनाच्या १९८६च्या फिफा विश्वचषक जेतेपदाचे शिल्पकार दिएगो मॅराडोना यांचे राहत्या घरी निधन झाले झाले होते. मॅराडोना यांचे निधन मेंदूवर झालेल्या शस्त्रक्रियेतून सावरत असतानाच हृदयविकाराच्या झटका बसल्याने झाले. पण आता सात महिन्यांच्या कालावधीनंतर मॅराडोना यांच्या मृत्यूबाबत सरकारी वकीलांनी त्यांच्या वैद्यकीय व नर्सिंग टीमवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता. ही कारवाई माजी अर्जेटिना फुटबॉलरचे वैयक्तिक चिकित्सक लिओपोल्डो लुक, मानसोपचारतज्ज्ञ अगस्टीना कोसाचोव्ह आणि अनेक परिचारिकांवर करण्यात आली आहे. मॅराडोना यांच्या शेवटच्या दिवसांत त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अर्जेटिनाच्या वकिलांकडून या सात जणांची सोमवारपासून चौकशी केली जाणार आहे.

रुग्णाच्या आरोग्याबद्दल वैद्यकीय कर्मचाऱ्यांना माहिती असताना देखील, चुकीची उपचार पद्धती वापरण्यात आली आणि त्यामुळे दिएगो मॅराडोना यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असा आरोप सात जणांवर लावण्यात आला आहे. ६० वर्षीय दिएगो मॅराडोना यांच्या गेल्या वर्षी मेंदूवर झालेल्या शस्त्रक्रियेतून सावरत असतानाच हृदयविकाराच्या झटका बसल्याने मॅराडोना यांचे निधन झाले झाले होते. मॅराडोना यांच्या शस्त्रक्रियेनंतर बिघडलेल्या प्रकृतीसाठी त्यांच्या पाच मुलांपैकी दोन मुलांनी न्यूरोसर्जन लिओपोल्डो लुक यांच्याविरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर हा तपास सुरु करण्यात आला.

गेल्या महिन्यात मॅरेडोना यांच्यावर करण्यात आलेल्या उपचारांबाबत अर्जेंटिनाच्या सरकारी वकिलांनी बोलावलेल्या २० वैद्यकीय तज्ञांच्या समितीने अहवाल दिला होता. त्यामध्ये मॅरेडोना यांच्यावर उपचारांची कमतरता आणि अनियमितता होती. त्यांच्यावर वैद्यकीय पथकाने लक्ष दिले नाही असे, म्हटले होते. योग्य वैद्यकीय सुविधेत पुरेसे उपचार करून मॅरेडोना यांनी जगण्याची चांगली संधी मिळू शकली असती, असा पॅनेलने निष्कर्ष काढला होता. त्याऐवजी राहत्या घरीच मॅरेडोना यांचे निधन झाले.

सध्या मॅरेडोना यांच्या मृत्यूबाबत मानसोपचारतज्ज्ञ अगस्टीना कोसाचोव (वय ३५), मानसशास्त्रज्ञ कार्लोस डायझ (२९), परिचारिका रिकार्डो अल्मिरॉन (३७) आणि डाहियाना माद्रिद (३६), नर्सिंग समन्वयक मारियानो पेरोनी (४०) आणि वैद्यकीय समन्वयक नॅन्सी फोर्लिनी (५२) यांच्यावर चौकशी सुरु आहे.

ही चौकशी सोमवारपासून पुढील दोन आठवड्यांपर्यंत सुरु राहणार आहे. यामध्ये त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबाबत त्यांना वकिलांमार्फत उत्तर देता येणार आहे. अर्जेंटिनामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे गेल्या महिन्यात सुनावणी तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर ही सुनावणी आता पुन्हा सुरु झाली आहे. जर आरोप सिद्ध झाले तर या सर्वांना ८ ते २५ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Paper
Top