Thursday, 29 Jul, 12.12 pm माझा पेपर

होम
केंद्राकडून 31 ऑगस्टपर्यंत कोरोना निर्बंध कायम

नवी दिल्ली - कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे चित्र दिसत असले तरीही दररोज वाढणारी रुग्णसंख्या मात्र स्थिर होत नसल्यामुळे दुसऱ्या लाटेतच तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहे. त्यापार्श्वभूमीवर केंद्राने राज्यांना काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्यांना कोरोना नियमांच्या सूचना जारी करण्यात आल्या असून 31 ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम राखण्याचा सल्लाही दिला आहे.

कोरोनाविषयक मार्गदर्शक तत्वे गृह मंत्रालयाकडून राज्यांना पाठवण्यात आली आहेत. पॉझिटिव्ह रुग्णाचे प्रमाण जास्त असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यास राज्यांना सांगण्यात आले आहे. 30 ते 40 हजारांच्या दरम्यान देशात दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. काही राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यानंतर निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. हळूहळू राज्य अनलॉक होत आहेत. पण, कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नसल्यामुळे केंद्राकडून राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना पाठण्यात आल्या आहेत. काही राज्यांत पूर्णपणे निर्बंध उठवले गेले नसले तरीही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आलेली आहे. यामुळे आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा एकदा पसरु शकतो. त्यामुळे केंद्राने पॉझिटिव्ही रेट जास्त असलेल्या जिल्ह्यांत कडक पावले उचलण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत.

सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी कोरोना मार्गदर्शक तत्वासंदर्भात पत्र पाठवले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये थोडीफार घट होत असेल तरीही कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. R घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरोना विषाणूची पुनरुत्पादन संख्या काही राज्यात एकच्या खाली घसरत असल्याचे पाहायला मिळत आहे. पण, काही राज्यात त्याचे प्रमाण जास्त आहे. कोरोना निर्बंधामध्ये सूट दिल्यास हे प्रमाण आणखी वाढू शकते. त्यामुळे पुनरुत्पादन घटकात कोणतीही वाढ होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी सर्व प्रयत्न केले पाहिजेत. ज्या जिल्ह्यांमध्ये अद्यापही पॉझिटिव्ह रुग्णाचे प्रमाण जास्त दिसत आहे, तिथे कठोर उपाययोजना कराव्यात, असे भल्ला यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Paper
Top