Thursday, 22 Jul, 12.28 pm माझा पेपर

होम
कोरोना उत्पत्तीसंदर्भातील तपासाला चीनने दिला नकार

बीजिंग - चीनमधून दीड वर्षांपूर्वी बाहेर पडलेल्या कोरोनाने जगभरात थैमान घातले. आतापर्यंत कोट्यावधी लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे आणि कोट्यावधी लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पण कोरोनाची उत्पत्ति कशी झाली या प्रश्नाचे उत्तर आतापर्यंत जगाला सापडलेले नाही. आता जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचे मूळ शोधण्यासाठी चीन आणि वुहानच्या प्रयोगशाळांमध्ये पुन्हा तपासणीचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यावर चीनने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेची (डब्ल्यूएचओ) कोरोनाच्या उत्पत्तीच्या दुसऱ्या टप्प्यातील तपासणीची योजना चीनने गुरुवारी फेटाळून लावली, ज्यामुळे चीनच्या प्रयोगशाळेत तपासणी करता येणार नसल्याचे एका उच्च आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले. या महिन्यात वूहान शहरातील प्रयोगशाळा आणि बाजारपेठेच्या माहितीसह चीनमधील कोरोनाच्या उत्पत्तीचा अभ्यासाच्या दुसरा टप्प्याचा प्रस्ताव डब्ल्यूएचओने दिला होता.

राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे (एनएचसी) उपमंत्री झेंग येक्सिन म्हणाले, अशी उत्तप्ती शोधणारी योजना आम्ही स्वीकारणार नाही, कारण ती काही बाबींमध्ये विज्ञानाकडे दुर्लक्ष करते. झेंग म्हणाले की त्यांनी जेव्हा पहिल्यांदा आरोग्य संघटनेची योजना वाचली, तेव्हा ते चकित झाले. कारण या प्रयोगशाळेतील प्रोटोकॉलच्या उल्लंघनामुळे संशोधनादरम्यान कोरोना पसरला गेल्याचे म्हटले आहे.

आम्हाला आशा आहे की चीनच्या तज्ञांची मते व सूचनांचा जागतिक आरोग्य संघटना गांभीर्याने आढावा घेईल आणि कोरोनाच्या उत्पत्तीचा शोध घेणे ही वैज्ञानिक बाब मानली जाईल आणि राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त होईल, असे झेंग म्हणाले. अभ्यासाचे राजकारण करण्यास चीन विरोध करते, असेही ते म्हणाले.

गेल्या शुक्रवारी सदस्य देशांच्या बैठकीत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रॉस अदहानम गेब्रेयेसस यांनी हा प्रस्ताव मांडला. यापूर्वी एक दिवस आधी, गेब्रेयेसस म्हणाले होते की, सुरुवातीच्या काळात चीनमध्ये कोरोनाचा प्रसार झाल्याची माहिती नसल्यामुळे पहिल्या तपासात अडथळे आले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वाखालील पथकाने मार्चमध्ये वुहानला भेट दिली होती. आरोग्य संघाच्या सदस्यांनी कोरोनाची उत्पत्ती शोधण्यासाठी तेथे चार आठवडे संशोधन केले होते. पण या काळादरम्यान चिनी संशोधक सावलीसारखे त्यांच्यासोबत राहिले. नंतर संयुक्त अहवालात, संघाने इतर काही प्राण्यांद्वारे कोरोना मानवांमध्ये पसरण्याची शक्यता व्यक्त केली होती.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Paper
Top