Friday, 24 Sep, 10.52 am माझा पेपर

होम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी हौसाक्का पाटील यांना श्रद्धांजली

मुंबई :- ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी हौसाक्का पाटील यांच्या निधनामुळे स्वातंत्र्य लढा ते आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीतील क्रांतिकारक दुवा निखळला आहे. त्यांचे जीवन क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याप्रमाणेच कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी वारसा ठरेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी वीरांगना हौसाक्का पाटील यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, स्वातंत्र्यलढा ते संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि त्याही पुढे अनेक सामाजिक चळवळीत हौसाक्का पाटील यांनी कन्या म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे सिद्ध केला. क्रांतिसिंहांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी तितक्याच आक्रमकतेने ब्रिटिशांना भंडावून सोडले होते. आधुनिक महाराष्ट्राच्या वाटचालीतही त्यांनी पुरोगामी विचार आणि वंचितांच्या हक्कांसाठी बाणेदारपणे आवाज उठवला. प्रसंगी संघर्षही केला. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या जडणघडणीतील एक महान क्रांतिकारक दुवा निखळला आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी वीरांगना हौसाक्का पाटील यांना विनम्र अभिवादन.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Paper
Top