Monday, 03 Aug, 5.52 pm माझा पेपर

होम
मुंबई पोलीस आयुक्तांकडून दिशाच्या त्या पार्टीवरुन सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम

मुंबई - काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिने आत्महत्येपूर्वी आयोजित केलेल्या पार्टीत काही राजकीय नेते उपस्थित असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. त्यावर 'इंडिया टुडे टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंग म्हणाले, ८ जून रोजी दिशाच्या होणाऱ्या पतीच्या घरी पार्टी आयोजित करण्यात आली होती. पण या पार्टीला कोणतेही राजकीय नेते उपस्थित नसल्यामुळे दिशाच्या पार्टीत राजकीय नेते उपस्थित असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

पार्टीत दिशाचा होणारा पती रोहन रॉय याच्यासह पाच जण उपस्थित होते. पण त्यात कोणतेही राजकीय नेते नव्हते. मध्यरात्री ३ वाजता दिशाने आत्महत्या केली. आम्ही सीसीटीव्ही फुटेत तपासले असून संबंधित व्यक्तींचा जबाब नोंदवण्यात आला आहे. दिशा दोन प्रोजेक्ट्सची कामे न झाल्याने तणावात असल्याची माहिती परम बीर सिंग यांनी दिली. ८ जून रोजी दिशाने मालाडमधील इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. ती २८ वर्षांची होती. दिशाच्या आत्महत्येच्या चार-पाच दिवस आधीच दिशा आणि रोहन मालाड येथील घरात राहायला गेले होते.

परदेशी राहत असलेल्या एका मित्राचा फोन आल्याने ती दुसऱ्या रुममध्ये बोलायला गेली. तिने रुम आतून लॉक केला होता. दिशा जवळपास २० मिनिटे फोनवर बोलल्याची माहिती त्या मित्राने पोलिसांना दिली. थोड्या वेळानंतर रोहन व त्याचे मित्र दिशाला बोलवू लागले. पण कोणतेच उत्तर रुममधून न मिळाल्याने त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. दरवाजा उघडल्यानंतर आता दिशा नव्हती. खिडकीतून खाली पाहिले असता इमारतीच्या मागच्या बाजूस असलेल्या पार्किंग परिसरात रक्ताच्या थारोळ्यात दिशा पाहायला मिळाली. तिला शताब्दी रुग्णालयात ताबडतोब दाखल केले असता, तेथे ती मृत घोषित करण्यात आली. अभिनेता सुशांत सिंह राजपूतने दिशाच्या आत्महत्येनंतर काही दिवसांनी आत्महत्या केली. १४ जून रोजी सुशांतने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Paper
Top