Sunday, 23 Feb, 8.12 pm माझा पेपर

होम
नखांचा पिवळेपणा असा दूर करा..

सुंदर, सुबक आकाराची स्वच्छ नखे असलेले हात कोणाला आवडत नाहीत? व्यवस्थित ग्रूम केलेल्या, मजबूत आणि चमकदार नखांनी हातांची शोभा वाढते. पण अनेक वेळा निरनिराळ्या कारणांनी नखे पिवळी दिसू लागतात. महिलांमध्ये नखे पिवळी दिसण्याची कारणे म्हणजे स्वयंपाक करताना सतत मसाल्यांमध्ये हात असणे, नखांना सतत नेल पॉलिश लावून ठेवणे, नखांची अस्वच्छता ही असू शकतात, तर पुरुषांमध्ये सतत धूम्रपान करण्याची सवय, नखे पिवळी दिसण्याचे कारण असू शकते. त्याशिवाय सर्वसामान्यपणे नखे अस्वच्छ असून त्यावर ' फंगस ' जमा होणे, अपुरे पोषण, या कारणांमुळेही नखे दिसू शकतात. अनेक महिलांना नेल पॉलिश लावण्याची सवय असते. अश्या महिला सतत नखांना नेल पॉलिश लावूनच ठेवतात. खरे म्हणजे नेल पॉलिश काही काळ लावून ठेऊन त्यानंतर ते रिमूव्हर वापरून काढून टाकून, त्यानंतर काही दिवस नखे विना नेल पॉलिश ठेवायला हवीत. पण असे न केल्याने नखे पिवळी पडतात. आणि मग पार्लर मध्ये जाऊन पेडीक्युअर करविण्याचा पर्याय स्वीकारला जातो. पण काही घरगुती उपायांनी देखील नखांचा पिवळेपणा दूर करता येतो.


दातांना स्वच्छ करण्यासाठी जशी टूथपेस्ट कामी येते, तसेच नखांचा पिवळेपणा दूर करण्यासाठीही टूथपेस्ट उपयोगात आणता येते. या साठी सर्व नखांवर थोडी टूथपेस्ट लावून दोन मिनिटे नखे हळुवार हाताने घासावीत. त्यांनतर हात स्वछ धुवावेत, आणि टॉवेलने कोरडे करून नखांना मॉईश्चरायझर लावावे.

लिंबू एक नैसर्गिक ब्लिचिंग एजंट आहे. लिंबाने ही नखांचा पिवळेपणा दूर करता येतो. लिंबाची साल नखांवर घासल्याने नखांचा पिवळेपणा दूर होतो. तसेच एका भांड्यामध्ये थोडेसे गरम पाणी घेऊन त्यामध्ये लिंबाचा रस टाकावा आणि त्या पाण्यामध्ये बोटे बुडवून पंधरा मिनिटांकरिता ठेवावीत. अधून मधून नखे नेल फायलर वापरून साफ करीत राहावे. त्यानंतर बोटे गरम पाण्यातून बाहेर काढून साध्या पाण्याने स्वछ धुवावीत. नखे पुसून कोरडी करून त्यावर मॉईश्चरायझर लावावे.

लिस्टरीन माऊथवॉश मुळे तोंडातील सर्व जंतू नाहीसे होण्यास मदत तर होतेच, त्याशिवाय श्वासाची दुर्गंधी देखील नाहीशी होते. पण लिस्टरीनचा उपयोग नखांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. नखांवर फंगसमुळे पिवळेपणा येतो. लिस्टरीन मुळे नखांवरील फंगस दूर होण्यास मदत होते. या करिता एका भांड्यामध्ये थोडेसे पाणी घेऊन त्यामध्ये लिस्टरीन घालावे आणि त्यामध्ये बोटे बुडवून ठेवावीत. पंधरा मिनिटांनंतर बोटे पाण्यातून काढून साध्या पाण्यामध्ये धुवून घ्यावीत. बेकिंग सोड्याच्या वापराने देखील नखांचा पिवळेपणा कमी होतो. यासाठी अर्धा चमचा बेकिंग सोडा घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस घालून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट नखांना काही वेळ लावून ठेवावी व दहा मिनिटांनी हात स्वछ धुवावेत.

जर आपल्या आहारामध्ये काही पोषक तत्वांची कमतरता असेल, तर त्यामुळे देखील नखे पिवळी पडू शकतात. आहारामध्ये झिंकची कमी असेल्याने ही समस्या उद्भवते. ही कमतरता पूर्ण करण्यासाठी शेंगदाणे, पालक, राजमा यांचा समावेश करावा. पाणी पिण्याचे प्रमाणही योग्य असावे. महिलांनी नखांवर सतत नेल पॉलिश लावणे टाळावे. आठवड्यातून किमान दोन दिवस नखे नेल पॉलिश विरहित ठेवावीत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Paper
Top