Sunday, 07 Mar, 12.28 pm माझा पेपर

होम
राम मंदिराच्या निर्माणासाठी सुरु करण्यात आलेली निधी जमवण्याची मोहिम बंद

नवी दिल्ली - भव्य राम मंदिराची उभारणी अयोध्येमध्ये करण्यासाठी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून जोमाने काम सुरू असून देशभरातून राम मंदिराच्या उभारणीसाठी जनतेकडून देणगी देखील स्वीकारल्या जात होत्या. पण, त्यावरून गेल्या काही दिवसांमध्ये मोठा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. आता या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे घरोघरी जाऊन मंदिर उभारणीसाठी देणगी गोळा करण्याची मोहीम बंद करण्यात आल्याचे राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर राम मंदिरासाठी आत्तापर्यंत अडीच हजार कोटींचा निधी जमा झाल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेने दिली आहे.

यासंदर्भात एएनआयशी बोलताना राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, घरोघरी जाऊन राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्याची मोहीम आता बंद करण्यात आली असून जर लोकांना देणगी द्यायची असेल, तर त्यांनी ती ऑनलाईन पद्धतीने द्यावी. ट्रस्टच्या वेबसाईटवर त्यासाठी ते जाऊ शकतात. मंदिराच्या समोरच्या बाजूची जमीन अधिग्रहित करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठीची बोलणी देखील सुरू आहेत. पण त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पण राम मंदिराची उभारणी येत्या ३ वर्षांमध्ये पूर्ण होईल.

दरम्यान, राम मंदिराच्या उभारणीसाठी गोळा करण्यात आलेल्या देणगीची रक्कम अडीच हजार कोटींपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. बँकांमध्ये ४ मार्चपर्यंत जमा झालेल्या चेकनुसार राम मंदिरासाठी सुमारे अडीच हजार कोटींची देणगी जमा झालेली असल्याचे विश्व हिंदू परिषदेकडून सांगण्यात आल्याचे एएनआयने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Paper
Top