Saturday, 25 Sep, 12.04 pm माझा पेपर

होम
रस्त्यांमधील खड्डे भरण्याचे निकृष्ट काम करणाऱ्यांवर कडक कारवाई करा - एकनाथ शिंदे

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. रस्त्यावरील खड्डे, पॅचवर्क आदी कामे ही दर्जेदार व्हायला हवीत, याकडे कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. निकृष्ट कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

पालकमंत्री शिंदे यांचा आनंदनगर चेक नाका येथून पाहणी दौरा सुरू झाला. घोडबंदर रोड, कासारवडवली, वाघबिळ, पडघा टोल नाका या भागातील रस्त्यांची त्यांनी पाहणी केली. खड्डे बुजविण्याची कामे सुरू असलेल्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी स्वतः कामाचा दर्जा कसा आहे हे पाहिले. यावेळी त्यांनी संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना कामाच्या दर्जाबाबत विचारणा केली.

पालकमंत्री शिंदे म्हणाले की, जिल्ह्यातील विविध विभागांमार्फत रस्त्यांची कामे सुरू आहेत. पावसाळ्यापूर्वी सर्व संबंधित विभाग व कंत्राटदार यांची बैठक घेऊन खड्डे बुजविण्याचे व रस्ते सुव्यवस्थित ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे कामे करण्यात आली. परंतु अनेक ठिकाणी पावसामुळे दुरुस्त केलेल्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. केलेली कामे जर पुन्हा नादुरुस्त होत असतील तर ते बरोबर नाही. अशा प्रकारे निकृष्ट कामे करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करावी. तसेच रस्त्यांची कामे दर्जेदार होतील हे पाहण्याची जबाबदारी अधिकाऱ्याची आहे. त्यांनी ती व्यवस्थित पार पाडवी. तसेच भविष्यात अश्या प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी घ्यावी.

गेल्या काही काळापासून खराब रस्त्यांमुळे व वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना त्रास होतो आहे. ठाण्यात मेट्रो, उड्डाणपूल आदींची कामे सुरू आहेत. मात्र या कामांमुळे रस्त्यांवर खड्डे पडून नागरिकांना त्रास होता कामा नये, याची खबरदारी संबंधित यंत्रणांनी घ्यावी, असेही पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले.

या पाहणी दौऱ्यात खासदार राजन विचारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त विपीन शर्मा यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, राज्य रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, वाहतूक पोलीस आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

डोंबिवलीतील घटना दुर्दैवी; खटला जलदगतीने चालविणार
डोंबिवली येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत दुर्दैवी आणि काळीमा फासणारी आहे. या घटनेतील २७ ते २८ संशयितांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी जे दोषी असतील त्यांना सोडले जाणार नाही. हा खटला जलदगतीने चालविण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. डोंबिवली सारखी घटना पुन्हा होऊ नये यासाठी कडक पावले उचलण्यात येत आहेत, असे पालकमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Paper
Top