Thursday, 14 Oct, 11.44 am माझा पेपर

होम
सातव्या शतकातील या मंदिरात दिवसात तीनवेळा रूप बदलते देवी

धर्मनगरी उज्जैन पासून ६५ किमी अंतरावर चंडमुंड राक्षसांचा संहार करणाऱ्या चामुंडा मातेचे एक ऐतिहासिक मंदिर आहे. या मंदिरात माता दिवसभरात तीन रूपे बदलते असे सांगितले जाते. म्हणजे सकाळच्या वेळात दर्शन केले तर ती कुमारीस्वरुपात दिसते, दुपारी युवतीस्वरुपात दिसते तर रात्री वयस्क स्त्री रुपात दर्शन देते असे भाविक सांगतात. मध्यप्रदेशातील उज्जैन जवळ गजनीखेडी गावात हे ऐतिहासिक मंदिर असून ते सहाव्या किंवा सातव्या शतकात गुप्त राजवटीत बांधले गेले आहे. भूमिज शैलीचा हा उत्तम नमुना मानला जातो.

या मंदिराच्या कळसाची तोडफोड महमूद गझनी याने धार येथे आक्रमण केले तेव्हा केली होती आणि या ठिकाणीच त्याच्या सैन्याचा अनेक दिवस तळ होता व त्यावरूनच गावाचे नाव गजनीखेडी पडले असे सांगितले जाते.

मंदिराच्या गर्भगृहात चामुंडा मातेची प्रतिमा आहे. त्या शेजारी स्कंदमाता, प्रतीस्कंद माता यांच्या मूर्ती असून दुसरीकडे शेषशायी गणेशाची अत्यंत दुर्मिळ मूर्ती आहे. पुरातत्व तज्ञांच्या मते अशी एक मूर्ती नेपालच्या काठमांडू मध्ये असून अश्या मूर्ती अत्यंत दुर्लभ आहेत. चामुंडामाता या भागातील अनेकांची कुलदेवता आहे. मंदिर परिसरात अनेक राजपूत राजांच्या छतऱ्या आहेत. तसेच गिरी समाजातील अनेक पुजाऱ्यांच्या संजीवन समाध्या आहेत. मंदिर परिसरात एक सुंदर जलकुंड आहे. या मंदिरासंदर्भात अनेक दंतकथा प्रचलित आहेत.

हे देवस्थान जागृत मानले जाते. चैत्र आणि शारदीय नवरात्रात येथे भाविकांची मोठी गर्दी होते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Paper
Top